डंपरचालकाची एसटी बसचालकास मारहाण; डंपरचालकाविरोधात पोलिसात गन्हा
By देवेंद्र पाठक | Published: April 20, 2023 08:27 PM2023-04-20T20:27:35+5:302023-04-20T20:27:51+5:30
धुळे तालुक्यातील मुकटी शिवारातील घटना
धुळे : एसटी बसच्या राँग साइडने डंपर नेणाऱ्या चालकास बसचालकाने हटकले असता, डंपरचालकाने एसटी बसला थांबण्यास भाग पाडले. यानंतर बसचालकाजवळ जाऊन त्याला मारहाण केली. ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी शिवारात बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जितेंद्र कल्याण बोरसे (रा. म्हसवे, ता. पारोळा) या बसचालकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पारोळा- धुळे रस्त्यावर मुकटी गावाच्या जवळ डंपर चालकाने (एमएच ४६ बीएफ ५९३४) एसटी बसला राँग साइडने ओव्हरटेक करत डंपर पुढे नेला. पुढे जाऊन अचानक वेग कमी केला. त्यास व्यवस्थित वाहन चालविण्याचे सांगितल्यावर डंपरचालकाने शिवीगाळ केली. त्यानंतर एसटी बस रस्त्याच्या बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर बसचालकाला हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत करण्यात आली. जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, ३२३, ५०४, ५०६ यासह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन घटनेचा तपास करीत आहेत.