गणेशोत्सव काळात हद्दपार तरुणाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
By देवेंद्र पाठक | Published: September 2, 2022 11:37 PM2022-09-02T23:37:20+5:302022-09-02T23:37:32+5:30
देवपुरातील घटना, संशयित तरुण होता हद्दपार
देवेंद्र पाठक
धुळे : प्रांताधिकारी यांनी हद्दपार करुनही संशयित राेहित रविकांत सानप हा देवपुर भागात फिरत असताना पोलिसांनी पकडले. त्याचा राग येऊन त्याने काेयत्याने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना देवपुरातील विघ्नहर्ता कॉलनीत घडली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, रोहित सानप याच्याविरोधात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला.
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रोहित रविकांत सानप (वय २६, रा. विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर) याला ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पावेतो शहरात प्रतिबंध केलेला आहे. यासंदर्भात देवपूर पोलिसांमार्फत नोटीस देखील देण्यात आलेली आहे. असे असताना देखील शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो देवपूर भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती देवपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्याला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी भरत कोष्टी व शोध पथकातील मिलींद सोनवणे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार साबळे आणि चव्हाण यांचे पथक रवाना झाले. पोलिसांना पाहून त्याने काेयता हातात घेऊन पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात भरत कोष्टी यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी सापळा लावून रोहित सानप याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस कर्मचारी भरत कोष्टी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहित सानप याच्याविरोधात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. रोहित सानप याला अटक केली आहे.