धुळ्यात प्रौढाला ४३ हजारात गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:38 PM2019-12-20T22:38:33+5:302019-12-20T22:39:25+5:30
फसवणूक : खोटी बतावणी चांगलीच भोवली
धुळे : क्रेडीट कार्डचे व्हेरीफिकेशन करायच्या नावाने माहिती घेवून एका पौढाला ४३ हजारांत गंडविले असल्याची घटना धुळ्यात घडली़ याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़
देवपुरातील स्रेहप्रभा हौसिंग सोसायटीत राहणारे प्रदीप काशिराम पाटील (५८) यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, बँकेतून बोलत असून क्रेडीट कार्डचे व्हेरीफिकेशन करायचे आहे़ त्यामुळे बँक खात्याची सविस्तर माहिती द्यावी, अशी खोटी बतावणी करण्यात आली़ बँकेतून बोलत असल्याने त्यावर विश्वास ठेवत प्रदीप पाटील यांनी स्वत:च्या बँकेतील खात्याबाबतची आवश्यक ती माहिती देवून टाकली़ यानंतर अल्पवधीतच आॅनलाईन ट्रान्झेक्शन करुन ४३ हजार ९९३ रुपये परस्पर काढून घेण्यात आले़ पैसे बँक खात्यातून परस्पर लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेशी संपर्क साधण्यात आला़ फसवणूक झाल्याची घटना २५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली आहे़
घटना लक्षात आल्यानंतर तातडीने प्रदीप पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठले़ आपली कोणीतरी फसगत केल्याचे सांगत आपबिती कथन केली़ त्यानंतर १९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली़ त्यानुसार, फसगत करणाऱ्याविरुध्द भादंवि कलम ४२० सह आयटी अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे घटनेचा तपास करीत आहेत़