आगीत संसारोपयोगी साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:45 AM2021-04-30T04:45:56+5:302021-04-30T04:45:56+5:30
आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, ...
आयुष्याची पुंजी जळून खाक : दोन कुटुंबे उद्ध्वस्त, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक
दोडाईचा : कोरोनाने सर्वत्र कहर केला असतानाच, शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे येथील दोन शेतकरी कुटुंबे घराला आग लागल्याने पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. गृहोपयोगी साहित्यासह धान्य, बियाणे, आयुष्याची रोख पुंजी जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत. आज त्यांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला, पण उद्याचे काय? असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
दोडाईचापासून सात किमी लांब असलेल्या रहिमपुरे गावची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. सर्वांची गुजराण शेतीवरच चालते. काका निंबा नथा पाटील व पुतण्या विश्वास गोरख पाटील शेजारी राहतात. दोघांचा ओटा एक व सामायिक भिंत असलेले घर. काल रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झाले. ६५ वर्षीय निंबा पाटील व ६० वर्षीय सुमन पाटील या वयोवृद्ध दाम्पत्यास मूलबाळ नाही. पुढील आयुष्यात पैसे उपयोगी पडावे म्हणून काबाडकष्ट करून त्यांनी पैसा जमा केला. हरभरा विकून व विकास सोसायटीतून पीक कर्ज काढून घरात ७ लाख रुपयांची रोकड ठेवली होती. या पैशातून ते घर बांधणार होते व उर्वरित रक्कम पुढील आयुष्यासाठी ठेवणार होते. उतार वयात पैशाचा आधार असावा म्हणून ते रोख पैसे घरातच ठेवत होते. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर अंगणात फिरत असताना शेजाऱ्यांना निंबा पाटील यांच्या घरातून धूर येताना दिसला. लगेच साडेनऊच्यादरम्यान सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. गावकऱ्यांनी आग शमविण्यासाठी गावातून पाणी आणले. दोंडाईचा-शिंदखेडा येथील अग्निशमन बंब आले, तरीही मोठ्याप्रमाणातील आगीपुढे कोणाचे काहीही चालले नाही. आगीत निंबा पाटील यांचे राहते घर, ७ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, घरातील सामान, धान्य, हरभरा जळून खाक झाला. त्या दाम्पत्याच्या अंगावर उरले फक्त त्यांचे कपडे. नातेवाईक व गावकऱ्यांनी आज त्यांना मदत केली;पण उद्याचे काय?असा प्रश्न त्यांच्यापुढे सध्या आहे.
त्यांचे शेजारी, नात्याने पुतणे विश्वास गोरख पाटील दोडाईचाला मका फॅक्टरीत कामाला आहेत. आगीत दीड लाख रोकड, सोन्याचे दागिने, फ्रीज, टीव्ही, घरगुती साहित्य, रासायनिक खत, शिलाई मशीन, फॅन जळून खाक झाला. शून्यातून पुन्हा सर्व उभे कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते आता कोठून आणणार, पेरणी कशी करणार, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत आहेत. आज राहायला घर नाही, खाण्यास धान्य नाही, कपडे नाहीत. पुढील आयुष्य जगायचे तरी कसे?हा प्रश्न पडला आहे.