धुळे महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 07:38 PM2017-12-09T19:38:25+5:302017-12-09T19:39:04+5:30
विरोधी पक्षनेतेपदी वैशाली लहामगे, महिला बालकल्याण समितीचीही फेररचना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे: मनपा स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबरला पूर्ण होत असल्याने नवीन सदस्यांची निवड होणार आहे़ विरोधी पक्षनेते गंगाधर माळी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी वैशाली लहामगे यांची वर्णी लागली असून, लवकरच औपचारीक घोषणा होणार आहे़ त्याचप्रमाणे महिला बालकल्याण समितीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या समितीची देखील फेररचना केली जाणार आहे़
इच्छुकांचा पाठपुरावा सुरू
मनपाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या स्थायी समितीत १६ सदस्यांचा समावेश आहे़ त्यापैकी निम्म्या अर्थात ८ सदस्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०१७ ला पूर्ण होत आहे़ त्यामुळे नवीन सदस्यांची निवड होणार असून त्यासाठीची पूर्वप्रक्रिया नगर सचिव कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे़ स्थायी समितीतून सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चार सदस्यांसह शिवसेना, काँग्रेसचा प्रत्येकी एक व शहर विकास आघाडीचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत़ त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आतापासून सदस्यत्वाची मागणी नोंदविण्यास सुरूवात केली आहे़ तर महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ २२ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने महिला बालकल्याण समितीची फेररचना केली जाणार आहे़
त्यासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विशेष महासभा होईल़ त्यानुषंगाने प्रत्येक पक्षात स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीसाठी इच्छुक असलेल्यांकडून आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जात आहे़
विरोधी पक्षनेतेपदी लहामगे
शिवसेनेचे गंगाधर माळी यांची ४ आॅक्टोबर २०१६ ला विरोधी पक्षनेते पदी निवड झाली होती़ त्यांना या पदावर एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्याने पक्ष पातळीवर नवीन विरोधी पक्षनेता निवडीच्या हालचाली सुरू होत्या़ त्यानुसार शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्या पत्नी वैशाली लहामगे यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली आहे़ त्याबाबत गटनेत्यांकडून महापौरांना पत्र दिले जाईल व अधिकृत घोषणा १२ डिसेंबरला केली जाईल़ असे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़
सभापती पदांसाठीही रस्सीखेच
स्थायी समितीसह महिला व बालकल्याण समितीत यंदा कुणाची वर्णी लागते हे अद्याप स्पष्ट नसले तरी सत्ताधारी पक्षाच्या काही इच्छुक सदस्यांनी थेट स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू केला आहे़ स्थायी समिती सभापतीपदी विद्यमान सभागृह नेते कमलेश देवरे यांचे नाव सध्या चर्चेत आहे़ मात्र कुणाची वर्णी लागते हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे़ तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाची माळ कुणाच्या गळयात पडते हे देखील येत्या काळात स्पष्ट होणार आहे़
हे सदस्य होणार निवृत्त़़़
राष्ट्रवादीच्या मायादेवी परदेशी, ललीता आघाव, जैबुन्निसा पठाण, नाना मोरे, शिवसेनेचे संजय गुजराथी, काँग्रेसचे इस्माईल पठाण, शहर विकास आघाडीचे साबीर सैयद, चित्रा दुसाने.क
हे सदस्य राहणार कायम़़
सभागृह नेते कमलेश देवरे, यमुनाबाई जाधव, दीपक शेलार, कैलास चौधरी, गुलाब महाजन, शेख हजराबी महंमद, शिवसेनेतर्फे जोत्स्ना पाटील आणि भाजपतर्फे वालीबेन मंडोरे.
महिला बालकल्याण समितीचे विद्यमान सदस्य़़़
वैशाली लहामगे, शकुंतला जाधव, मोमीन आतियाबानो दोस्त महंमद, कल्पना बोरसे, इंदुबाई वाघ, इंदुबाई बोरसे, चंद्रकला जाधव, अन्सारी अफजलुन्नीसा फजलु रहेमान, अन्सारी हलीमाबानो मोहम्मद शाबान, माधुरी अजळकर आणि प्रभावती चौधरी यांची महिला बालकल्याण समितीत गेल्या वर्षी निवड झाली होती़ समितीची दरवर्षी फेररचना होत असल्याने विद्यमान सदस्यांपैकी कुणाला आणखी संधी मिळते का? याकडे लक्ष असणार आहे़ गेल्या वर्षी ११ पैकी सहा सदस्यांना दुसºयांदा सदस्यत्व मिळाले होते़