धुळ्यातील एकवीरादेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:01 PM2018-03-26T17:01:28+5:302018-03-26T17:01:28+5:30
चैतन्य : ३० मार्चला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम; ३१ रोजी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास चैत्र पौर्णिमा अर्थात ३१ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांना आकर्षित करणारे पाळणे येण्यास सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवात ३० रोजी जाऊळाचा कार्यक्रम होणार असून यात्रोत्सवाच्या दिवशी सायंकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम
गेल्या आवड्यात गुढी पाडव्यापासून एकवीरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला होता. तेव्हापासून श्रीराम नवमीपर्यंत एकवीरादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकवीरादेवी मंदिरात दररोज भगवतीची पंचामृत महापूजा, सप्तशती पाठाचे वाचन, महानैवेद्य आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.
३० मार्चला उतरणार जाऊळ
एकवीरादेवी मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३० मार्चला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये; म्हणून मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे; याउद्देशाने मंदिराच्या मुख्य गाभाºयात तसेच मंदिराच्या पूर्र्वेकडच्या भागात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.
एकवीरादेवी मंदिरातील भक्त निवास फुल्ल
३० मार्चला जावळाच्या कार्यक्रमानिमित्ताने येणाºया भाविकांनी मंदिर परिसरातील भक्त निवासात राहण्यासाठी यापूर्वीच नोंदणी करून ठेवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मंदिरातील १२ भक्त निवास फुल्ल झाले आहे. अनेक भाविक यात्रोत्सवाच्या काळात मंदिरातील भक्त निवासमध्ये तीन ते चार दिवस राहत असतात.
आदिशक्ती एकवीरा देवीच्या मुख्य गाभाºयालगत भव्य आशियाना मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मंडपातील चारही बाजुंना १० कुलूर ठेवण्यात येणार आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील विक्रेत्यांनी मंदिरापासून पुढे पंचवटीपर्यंत दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे.