धुळ्यातील एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:19 PM2018-03-30T14:19:24+5:302018-03-30T14:59:37+5:30
चैतन्य : लहान मुलांचे जाऊळ उतरविण्यासाठी भाविकांची मंदिरात अलोट गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवास शुक्रवारपासून थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभरात एक हजाराहून अधिक मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुलाचारासाठी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी झाल्याने भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला होता.
चैत्र महिन्यातील चौदासच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही उत्तर महाराष्टÑातील अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव धुळे जिल्ह्यासह मुंबई, पुणे, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविक शुक्रवारी एकवीरादेवी मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची महापूजा व आरती मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते झाली. यावेळी नंदुरबार सत्र न्यायालयाचे न्या. गुलाबराव पाटील, एकवीरादेवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी माध्यान्ह आरती औरंगाबाद येथील महेश प्रभाकर विसपुते यांच्या हस्ते झाली.