एकवीरादेवी नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:09 PM2019-09-29T13:09:09+5:302019-09-29T13:09:44+5:30
सकाळी घटस्थापना। जय्यत तयारी पूर्ण; कार्यक्रमांची रेलचेल
धुळे : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवीच्या नवरात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे. २९ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़
रविवारी पहाटे पाच वाजता एकवीरादेवी मंदिरात मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव,व सर्व ट्रस्टी यांच्याहस्ते आरती होईल व सकाळी ८ वा़ घटस्थापना होईल़ दुपारी १२ वाजता महापूजा व महाआरती होईल़ दररोज दुपारी बारा वाजेच्या महाआरती नंतर साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे़
नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज ५ महाआरतींचे आयोजन करण्यात आले आहे़ ललिता पंचमी ३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १०१ कुमारी पूजन, रविवारी ६ आॅक्टोबरला नवचंडी यज्ञ व पुर्णाहुती, ७ आॅक्टोबरला महानवमी व सुवासिनी पूजन, ८ आॅक्टोबरला विजया दशमी सिमोलंघन, १३ आॅक्टोबरला कोजागिरी पोर्णीमा उत्सवा निमित्त दुपारी बारावाजेच्या आरती नंतर मंदिर परिसरात भगवतीदेवी पालखी सोहळा, शंखतिर्थ, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ५६ भोग नैवेद्य, देवीचा जागरण गोंधळ आयोजित करण्यात आला आहे़
नवरात्रोत्सवा निमित्ताने संपूर्ण मंदिराचा परिसरात विद्युत रोशणाई करण्यात आलेली आहे. भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी रेलिंग व बॅरिकेटसची व्यवस्था करण्यात आलेली आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे़ सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, मधुकर गुरव, मनोहर गुरव, सदाशिव पुजारी यांनी कळविले आहे.