धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध
By अतुल जोशी | Published: March 1, 2024 07:39 PM2024-03-01T19:39:57+5:302024-03-01T19:59:38+5:30
धुळे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वर्षी गटाच्या ज्योती देवीदास बोरसे यांची, तर शिक्षण व आरोग्य ...
धुळे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वर्षी गटाच्या ज्योती देवीदास बोरसे यांची, तर शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदी खलाणे गटाच्या सोनी युवराज कदम यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदखेडा तालुक्याला पुन्हा दोन विषय समिती सभापती पदे मिळाली आहेत.
सभापती निवडीसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राहुल जाधव होते. तर सहायक पीठासीन अधिकारी भाऊसाहेब अकलाडे होत. सकाळी ११ ते दुपारी १ अशी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. दुपारी १२:३० वाजता महिला व बालकल्याण सभापती पदासाठी ज्योती बोरसे यांनी, तर शिक्षण व आरोग्य सभापती पदासाठी सोनी कदम यांनी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल केला.
दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. नियोजित वेळेत एकाही उमेदवाराने अर्ज माघार न घेतल्याने, महिला व बालकल्याण तसेच शिक्षण व आरोग्य समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. दोन्ही सभापतींची निवड बिनविरोध निवड जाहीर होताच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही बाके वाजवून या निवडीचे स्वागत केले.