वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की टेलिफोनचीही केली तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 10:46 PM2020-01-06T22:46:47+5:302020-01-06T22:47:06+5:30
रामवाडी शाखा : शहर पोलिसात गुन्हा दाखल
धुळे : झाड तोडण्यासाठी वीज प्रवाह खंडीत करण्याकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन एकाने चक्करबर्डीतील वीज वितरण कंपनीच्या रामवाडी उपकेंद्राच्या कार्यालयात कर्मचाºयाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे़ यात टेलिफोनची देखील तोडफोड केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी योगेश पद्माकर सानप (२७, रा़ सुरत बायपास रोड, होंडा शो रुम जवळ, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे़ ते वीज वितरण कंपनीत तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत़ गेल्या चार वर्षापासून त्यांची नेमणूक चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळील रामवाडी उपकेंद्राच्या कार्यालयात आहे़ रविवार ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्यासह रमेश ठाकरे, प्रकाश जाधव, शशिकांत कुलकर्णी असे कार्यालयीन कामांत व्यस्त असताना कोळवले नगरातील रहिवाशी असलेले डॉ़ रघुवीरसिंग राजपूत नामक व्यक्ती आले़ त्यांनी घराजवळ असलेले झाड तोडावयाचे असल्याने विद्युत प्रवाह बंद करा, असे सांगितले़ त्यावर योगेश सानप यांनी त्यांना तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे रितसर अर्ज सादर करा, त्यांनी आम्हाला आदेशित केल्यानंतर आम्ही विद्युत प्रवाह बंद करतो, असे सांगितले़ मात्र, याचा राग आल्याने डॉ़ राजपूत यांनी वाद घातला़ तुम्ही येथे नोकरी कशी करतात, ते पाहतो, अशी धमकी देवून शिवीगाळ केली़ ते मारण्यासाठी अंगावर धावून आले़ शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ टेबलावरील फोन जमिनीवर आपटून फेकून नुकसान देखील केले़ शासकीय कामांत अडथळा निर्माण केला़ यावरुन डॉ़ रघुवीरसिंग राजपूत (रा़ भोलेबाबा नगर, मालेगाव रोड, धुळे) या संशयितांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे़