अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:47 PM2019-06-30T12:47:03+5:302019-06-30T12:47:40+5:30
विज्ञान शाखेची पहिली यादी । २ जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत, यादी बघण्यासाठी गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दहावीच्या निकालानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे कल आहे. विज्ञान शाखेसाठी गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील झेड.बी.पाटील कनिष्ठ महाविद्यालय व डॉ. पां.रा.घोगरे महाविद्यालयाची विज्ञान शाखेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली. पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले होते. गुणपत्रक मिळताच २१ जून पासून शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती.
झेड.बी.पाटील महाविद्यालय
झेड.बी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ११वीच्या अनुदानितच्या २४० व विना अनुदानितच्या १२० अशा एकूण ३६० जागा आहे. विज्ञान शाखेसाठी जवळपास एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधून शुक्रवारी सायंकाळी विज्ञान शाखेची पहिली गुणवत्ता (मेरीट) यादी जाहीर करण्यात आली.
यात अनुदानित वर्गात प्रवेशासाठी सर्वसाधारणची गुणवत्ता यादी ८९.४० टक्क्यांवर ‘क्लोज’ झाली. तर इतर मागासवर्ग ८६ टक्के, अनुसूचित जाती-७२.६०, अनुसूचित जमाती ८२.२०, एसबीसी ७३.६०, एसईबीसी ६२ टक्के. तर विनाअनुदानितसाठी जनरलचे मेरीट ८१ टक्क्यांवर ‘क्लोज’ झाले. ओबीसी ७८.२०, अनु.जाती- ६७.६०, अनु.जमाती-७९.८०, एसबीसी ७०.४० टक्यांवर लागले. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी मराठी माध्यमाची जनरलचे मेरीट ६२.८० टक्यांवर ‘क्लोज’ झाले. तर इंग्लीश मेडीयमचे ८५.६० टक्क्यांवर मेरीट ‘क्लोज’ झाले. संवर्गनिहाय मराठी व कंसात इंग्लिश मेडीयमचे मेरीट असे- ओबीसी ६१.८० (८४.६०), अनु.जाती-५१.८० (५४.२०), अनु.जमाती -५२.२० (४८.६०), एसबीसी-६८.६० (६९.२०). दरम्यान गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालय
एस.एस.व्ही.पी.एस. संस्थेच्या डॉ. पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालयात ११वीला प्रवेश घेण्यासाठी ११४० अर्ज प्राप्त झाले होते. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ४८० जागा आहेत. २८ जून रोजी विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
जनरलचे मेरीट ७५.६ टक्क्यांवर ता त्यानंतर ओबीसी-७४ टक्के, एससी-४०.८, एसटी-७५ टक्के, एनटी-६५.४, एसबीसी-६१.४ टक्यांवर ‘क्लोज’ झाले.
इलेक्ट्रॉनिक्स- जनरल-५०.८, ओबीसी-४६.६, एससी-५३.२, एसटी-५१.४, एनटी-५२.६, एसबीसी-६३.४ टक्क्यांवर लागले आहे.
विद्यार्थ्यांचा कल तंत्रनिकेतन शाखेकडे
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चांगले टक्के मिळालेले आहेत. दोन वर्षे सायन्स करण्यापेक्षा बहुतांश विद्यार्थ्यांचा कल आता व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आहे. त्यामुळे अनेकजण अकरावीला प्रवेश घेण्याऐवजी तंत्रनिकेतन, अथवा आयटीआयला प्रवेश घेण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.