धुळ्याच्या हात शेवयांची विदेशींना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:27 AM2019-03-08T11:27:37+5:302019-03-08T11:28:26+5:30

सुनिता महाजन :दरवर्षी सिंगापूर,अमेरिकेसह इतर देशातून हात शेवयाची होते मागणी

Embrace Dhuya's arms and move the foreigners | धुळ्याच्या हात शेवयांची विदेशींना भुरळ

dhule

Next

चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हाताशी कोणताही अनुभव नाही, कोणाकडून प्रशिक्षणही घेतलेले नाही, केवळ सासूबाईं मिरा महाजन यांना मदत व्हावी या उद्देशाने हात शेवयांचे काम शहरातील सुनिता महाजन यांनी आठ वर्षापूर्वी सुरू केले. आज त्यांच्या हात शेवयांना शहरातून विदेशात गेलेल्यांसह त्यांच्या परिचितांनाही भुरळ घातली आहे. दरवर्षी या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे हात शेवयांच्या माध्यमातून धुळे शहराचे नाव सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम आणि स्वयंरोजगाराकडून स्वयंसिध्दाकडे वाटचाल करण्याचे कार्य सुनीता महाजन यांनी केले आहे.
‘जुने ते सोने’ असे म्हणतात. आज आपण पाश्चात्य देशातील संस्कृती आत्मसात करीत आहोत. इतकेच नव्हे तर त्यांच्या पद्धतीची खाद्यपदार्थ देखील खातो. चायनिजसह इतरही पदार्थांची उदाहरणे यासंदर्भात देता येतील. मात्र विदेशात भारतीय संस्कृती, खाद्यसंस्कृतीबद्दल तेथील नागरिकांना कुतुुहल असल्याने अनेक जण त्यांच्या अभ्यासासाठी भारतात येतात. या प्रकारातून सुनिता महाजन यांच्या हात शेवयांची भुरळ विदेशातील नागरिकांना घातली आहे.
बेटावद (ता.शिंदखेडा) येथील माहेर असलेल्या सुनीता महाजन यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले. शिक्षण कमी, एक जबाबदारीतून मोकळे व्हायचे म्हणून वडिलांनी लग्न लावून दिल्याने सासरची जबाबदारी आली सासरीही फारशी चांगली स्थिती नव्हती. सासूबाई विविध प्रकारचे पापड, कुरडया व इतर पदार्थ तयार करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. पतीचा डी.जे.चा व्यवसाय. अशा परिस्थितीत घरांची जबाबदारी सांभाळून सासूबाईच्या कामात त्या हातभार लावत. अनेकांकडून हात शेवयांची मागणी होत असते. सुरूवातीला त्यांनी इतरांकडून आणून त्या पुरविल्या. मात्र त्याचा दर्जा पाहिजे तसा नसल्याने सहज म्हणून सुनीता यांनी घरीच हात शेवाया करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला कोणताही अनुभव नसल्याने अनेक अडचणी आल्यात. नुकसानही झाले. मात्र त्यांनी केलेल्या शेवया आवडू लागल्याने दरवर्षी त्याच्याकडे शेवायाची मागणी वाढू लागली. कमलाबाई संस्थेच्या संचालिका असलेल्या घुगरी मॅडम हे त्यांच्याकडून पापड घेत असल्याने त्यांनी शेवया घेतल्या. त्या सर्वांना आवडल्या. त्या शेवाया त्यांनी आपल्या दुबईतील नातीला पाठविल्या. नातीला त्या इतक्या आवडल्या की तिने अजून मागून घेतल्या. हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट ठरला. त्यानंतर डॉ.घुगरी यांचे इतर काही विदेशातील नातेवाईक, त्यांचें परिचित याच्याकडूनही हातशेवयाची मागणी होवू लागली. सुनीता महाजन या उत्कृष्ठ बॉस्केटबॉल खेळाडू आहेत. शालेय जीवनात त्यांना बॉस्केटबॉलची आवड असल्याने शाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग होत तेथे आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी राज्यपातळीवरील स्पर्धेतही सहभाग नोंदविला आहे. मात्र लग्नानंतर जबाबदारीमुळे खेळाकडे दुर्लक्ष झाल्याचे व त्यामुळे शिक्षणही पूर्ण न करू शकल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. मात्र तेवढ्यावर न थांबता त्यांनी आपणही स्वयंसिध्दा असल्याचे आपल्या कृतीतून समाजाला दाखवून दिले. अगदी शून्यातून त्यांनी आजचे यश गाठले असल्याचे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे उपक्रम४गेल्या चार वषार्पासून त्या विदेशात हातशेवाया पाठवित आहेत. साधारणपणे ७० ते ८० किलो शेवायाची विदेशातून मागणी होते. तर संपूर्ण सिजनमध्ये त्या ५०० ते साडेसातशे किलो शेवाया तयार करून विकतात. मनात आत्मविश्वास असला, मेहनत घ्यावयाची तयारी असल्यास यश हमखास मिळते हेच सुनीता महाजन यांच्या उदहारणातून दिसून येते. साधारणपणे चार महिने हा व्यवसाय चालतो. त्यानंतर त्या ब्युटीपार्लरही चालवितात.
हातशेवयांची वैशिट्ये
शेवया बनविणाऱ्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहे. त्यात पाटावरील शेवया,यंत्राच्या शेवया व हातशेवाया हे प्रमुख प्रकार आहेत. मात्र हात शेवायाची वैशिष्टये वेगळी आहे. हातशेवाया तयार करण्यासाठी प्रामुख्याने तुपाचा वापर केला जातो. तुपामुळे शेवायांना नरमपणा येतो. हाताने बनविल्याने एकसारखेपणा, बारीक व तुपामुळे आलेली वेगळी चव यामुळे अनेकांंकडून हातशेवायाची मागणी होते. हातशेवयासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सकाळी पाच वाजता उठून गहू भिजविणे, ते मळून घेणे,मैदा काढणे व नंतर त्यांचे पिठ तयार करावे लागते. त्यानंतर अगदी हळूवारपणे शेवायाची लांबी वाढावी लागते. अनेकदा शेवायी मधून तुटल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हातशेवायांचे काम करावे लागते.

Web Title: Embrace Dhuya's arms and move the foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे