डिजीटलबरोबर स्वयंअध्यापनावर जास्त भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:45 AM2019-09-06T11:45:57+5:302019-09-06T11:46:48+5:30
वान्मथी सी. : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराप्रसंगी प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांच्या क्षमता, विषयाची आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिकविण्यासाठी डिजीटलबरोबरच स्वयंअध्यापनावर जास्त भर द्यावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून वान्मथी सी. बोलत होत्या. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण देवरे, डायटच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, निरंतरचे शिक्षणाधिकारी नरेंद्र खंडारे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात राजेंद्र विक्रम भामरे (दह्याणे,ता. धुळे), पावबा धनजी बच्छाव (वाजदरे,ता. साक्री), गोकूळ पोपटराव पाटील (चुडाणे, ता. शिंदखेडा), वासुदेव रामदास चाचरे (बभळाज,ता. शिरपूर) या शिक्षकांना मान्यवरांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षकांनी आपल्या परिवारासह हा पुरस्कार स्वीकारला.
संदीप माळोदे म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शिक्षकांनी डिजीटल ऐवजी स्वत: शिकवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्राचार्य डॉ. विद्या पाटील, हेमंत भदाणे यांच्यासह आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी मनीषा वानखेडे यांनी केले.