Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:39 PM2019-09-23T22:39:20+5:302019-09-23T22:56:51+5:30
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालनाकडेही प्रशासनाचे बारीक लक्ष
धुळे - राज्य विधानसभेसाठी होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या प्रमाणात वाढ व्हावी यावर भर दिला आहे. त्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांसह शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्य, रॅली, मतदानासाठीच्या इव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक जिल्ह्यातील नागरिकांना दाखविण्यात येत असून त्याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनातर्फे राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी करण्यात आली किंवा करण्यात येत आहे, या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर मनमोकळा संवादही साधला़
प्रश्न : स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या जागृतीसाठी अजून काय केले जाणार आहे.?
गंगाथरन डी. : मुले चाणाक्ष असल्याने त्यांचे प्रबोधन केल्यास ते पालकांना आवर्जून माहिती देतात. त्यामुळे मुलांना मतदानाची माहिती व्हावी, त्याचे महत्त्व कळावे, यंत्रांद्वारे मतदान कसे करावे यासाठी त्यांच्याकरीता कविता, वक्तृत्व व निबंध तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रश्न : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी कसे प्रयत्न केले जाणार आहेत ?
गंगाथरन डी. : या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सनियंत्रण समिती कार्यरत आहे. तसेच कोणी आचारसंहितेचा भंग करत असेल, तर कोणीही त्याबाबत व्हीडीयो, फोटो काढून सी-व्हिजिल या मोबाईल अॅपद्वारे पाठवू शकतो. ते प्राप्त होताच लोकेशन (मतदारसंघ) घेऊन त्याबाबत नेमलेल्या भरारी पथकाद्वारे त्वरित कारवाई केली जाते. कोणी कुठे विनापरवानगी फलक लावत असेल, पैशांचा संशयास्पद व्यवहार, राजकीय पक्षांच्या रॅलीत शासकीय अधिकारी, कर्मचाºयांचा सहभाग याबाबत कोणालाही माहिती, फोटो अपलोड करता येऊ शकते.
प्रश्न : निवडणूक काळात कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी काय उपाय करणार?
गंगाथरन डी. : या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर उपाय योजले जातील. त्यासाठी पोलीस विभाग व उपविभागीय अधिकारी हे हद्दपारी, शस्त्र परवाना जप्त तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई या संदर्भात उपाययोजना संदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे.
प्रश्न : निवडणूक प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, पदाधिकाºयांना माहिती देण्यासाठी काय कार्यवाही होत आहे?
गंगाथरन डी. : निवडणुकीच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तिचे पालन, प्रचार खर्च, प्रचारासाठी लागणाºया आवश्यक परवानग्या व अन्य बाबी संदर्भात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठका घेऊन याबाबत सांगोपांग माहिती दिली जात आहे. त्यांच्या काही शंका, समस्या असतील तर त्यांचेही निराकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी त्यांचेही सहकार्य मिळत आहे. काही अडचणी असल्यास प्रसंगी ते माझ्याशीही संपर्क करू शकतात.
प्रश्न : मतदान ओळखपत्रांचे वाटप, निवडणूक कर्मचाºयांचे प्रशिक्षण याबाबत काय सांगाल?
गंगाथरन डी. : मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेनंतर २१ हजार नव्या मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. ते प्राप्त होताच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)मार्फत त्याचे वाटप सुरू आहे.निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांना दोन वेळा प्रशिक्षण दिले जाईल. २ आॅक्टोबर रोजी पहिले प्रशिक्षण होईल. इतर संबंधित अधिकाºयांचे यापूर्वीच प्रशिक्षण झाले आहे. प्रचारासाठी लागणाºया विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे.