प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:21 AM2019-07-04T11:21:20+5:302019-07-04T11:25:32+5:30
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना : जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जुनी पेंशन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे बुधवारी लक्षवेधी दिवस पाळून भोजन काळात क्युमाईन क्लबसमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आॅगस्ट २०१८मध्ये केलेल्या तीन दिवसीय आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर १ जानेवारी १६ पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अद्याप मंजूर न झाल्याने, राज्य सरकारी कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ जुलै रोजी लक्षवेधी दिवस पाळून निर्दशने केली. दरम्यान राज्य शासनाने कर्मचाºयांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी २० आॅगस्ट १९ रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी संप करतील असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगीत संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे एस.यू.तायडे, वाल्मीक चव्हाण, जिल्हा परिषद महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष उज्वल भामरे, कल्पेश माळी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जे.बी. सोनवणे, सुनील पवार, देवेंद्र ठाकूर, प्रा. बी.ए.पाटील, शशांक रंधे, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.