११३९ कामांवर ५ हजार ४०८ मजूरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 09:30 PM2020-08-30T21:30:31+5:302020-08-30T21:30:49+5:30

एमआरईजीएस : पावसामुळे कामांवर परिणाम, शेतशिवारांमध्ये कामे वाढल्याने मजुरांची उपस्थिती घटली

Employment of 5 thousand 408 laborers on 1139 works | ११३९ कामांवर ५ हजार ४०८ मजूरांना रोजगार

dhule

Next

धुळे : पावसाळ्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या घटली आहे़ जिल्ह्यात सध्या ११३९ कामे सुरू असून या कामांवर ५ हजार ४०८ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली़
दरवर्षी पावसाळ्यात एमआरईजीएसच्या कामांवर परिणाम होतो़ शिवाय शेतशिवारांमध्ये कामे वाढल्याने शासनाच्या कामांवर मजुरांची उपस्थिती घटते़ ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहयोची कामे घेतली जातात़ परंतु पावसाळ्यात मजुरांना शेतात काम मिळत असल्याने कामांची संख्या कमी कमी होत जाते़
ग्रामपंचायत स्तरावरील तालुकानिहाय कामे अशी:
धुळे तालुका
जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची ४ कामे सुरू आहेत़ या कामांवर ३८ मजुरांची उपस्थिती आहे़ घरकुलाच्या १२६ कामांवर ५१६ मजुरांची उपस्थिती आहे़ धुळे तालुक्यात जलसंधारण आणि कृषी विभागाचे एकही काम सुरू नाही़ तालुक्यात एकूण १३० कामांवर ५५४ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे़
साक्री तालुका
साक्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण ४९५ कामांवर २१९५ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे़ त्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या २४ रस्ते कामांवर २१४ मजूर, जलसंधारणाच्या १८ कामांवर १८७ मजूर, घरकुलाच्या ४४४ कामांवर १७३६ मजूर, कृषी विभागाच्या ५ कामांवर ३१ मजूर तर इतर ४ कामावर २७ मजुरांची उपस्थिती आहे़
शिंदखेडा तालुका
या तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ८ रस्ते कामांवर १३७ मजुरांची उपस्थिती आहे़ जलसंधारणाच्या १३ कामांवर १५९ मजूर, घरकुलाच्या ८७ कामांवर ३४१ मजूर, कृषी विभागाच्या सहा कामांवर ४५ मजुरांची उपस्थिती आहे़ शिंदखेडा तालुक्यात एकूण ११४ कामांवर ६८२ मजूरांची उपस्थिती आहे़ गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत तालुक्यात कामे वाढली आहेत़
शिरपूर तालुका
शिरपूर तालुक्यात रस्त्याचे आणि जलसंधारणाचे एकही काम सुरू नाही़ केवळ घरकुलाची ३९७ कामे सुरू असून या कामांवर १९५० मजुरांची उपस्थिती आहे़ याशिवाय इतर तीन कामांवर २७ मजुरांची उपस्थिती आहे़ शिरपूर तालुक्यात एकूण ४०० कामांवर १९७७ मजुरांची उपस्थिती आहे़
पावसाळा संपल्यानंतर यंत्रणा स्तरावर विकास कामांचे नियोजन सुरू होते़ साधारणपणे दिवाळीनंतर कामांना गती मिळते़ विविध विकासकामे हाती घेतली जातात़ त्यावेळी मजुरांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो़
लॉकडॉनमुळे महानगरांमधून गावाकडे परतलेले मजुर अजुनही गावातच आहेत़ दिवाळीपर्यंत त्यांचा रोजगार सुरू होईलच याची शाश्वती नाही़ अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे़ त्यामुळे दिवाळीनंतर देखील प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कामांचे नियोजन करावे लागणार आहे यात शंका नाही़
घरकुलाच्या कामांवर घरगुती मजूर
४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कामे घरकुलाची सुरू आहेत़ घरकुल कामांच्या मस्टरवर सहसा कुटूंबातील मजुरांचे जॉबकार्ड असते़ त्यामुळे या कामांवर उपस्थित असलेले मजूर असतीलच असे नाही़ बऱ्याचदा मस्टरवर कुटूंबातील सदस्य असतात़ तर घराचे बांधकाम मात्र ठेकेदाराला दिलेले असते़ कुटूंबातील सदस्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की ठेकेदाराचे पैसे अदा केले जातात़ ही लाभार्थ्याची सोय आहे़

Web Title: Employment of 5 thousand 408 laborers on 1139 works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे