तिजोरी खाली तरी मानधन भारी!
By admin | Published: July 17, 2017 01:09 AM2017-07-17T01:09:02+5:302017-07-17T01:09:02+5:30
७५ नगरसेवकांना मिळणार वाढीव मानधन : मनपावर वार्षिक २२ लाख ५० हजारांचा पडणार भार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्यातील सर्व महापालिका सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शनिवारी राज्य सरकारने घेतला़ यामुळे नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी मनपा प्रशासनाची तिजोरी खाली असताना वाढीव मानधन देण्यासाठी वार्षिक २२ लाख ५० हजार रुपयांचा भार मनपावर पडणार आहे़ धुळे महापालिकेच्या ७५ नगरसेवकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे़
धुळे महापालिकेचा समावेश ड वर्गात असल्याने पालिकेच्या ७५ नगरसेवकांना दरमहा ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून मनपाची आर्थिक परिस्थिती कमालीची घसरल्याने नगरसेवकांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागते़ असे असतानाच शनिवारी राज्य सरकारने नगरसेवकांना खूष करणारा निर्णय घेतला़
महापौर परिषदेतही ठराव
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे मानधन वाढविण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे सातत्याने झाली आहे़ त्याचप्रमाणे महापौर परिषदेत तसा ठरावही करण्यात आला होता़ दरम्यान, राज्य सरकारने या मागणीची दखल घेत राज्यातील सर्व २६ महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे़
मनपावर लाखोंचा भार
नगरसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी त्याचा थेट भार महापालिकेवर पडणार आहे़ धुळे महापालिकेच्या ७५ नगरसेवकांना सध्या ७ हजार ५०० रुपये दरमहा मानधन दिले जाते़ त्यासाठी मनपाला आतापर्यंत दरमहा ५ लाख ६२ हजार ५०० रुपयांची तरतूद, तर वार्षिक ६७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करावी लागत होती़ मात्र मानधनवाढीच्या निर्णयामुळे मनपाला दरमहा ७ लाख ५० हजार रुपयांची, तर वार्षिक तरतूद २३ लाखांनी वाढवून ९० लाख रुपयांची करावी लागणार आहे़
उत्पन्नाचे स्त्रोत हवेत
धुळे महापालिकेवर पडणारा भार लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी स्त्रोत शोधण्याचे आव्हान मनपासमोर असेल़ जकात बंद झाल्यापासून मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असून, अत्यावश्यक गरजा भागविणेही मनपाला अवघड जात आहे़ अशा परिस्थितीत झालेल्या मानधनवाढीच्या निर्णयामुळे मनपाला उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर द्यावा लागेल़ सद्य:स्थितीत मनपावर तापी पाणीपुरवठा योजनेच्या कर्जासह जवळपास २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे़ बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विविध योजनांमध्ये मनपा हिस्सा टाकतानाही पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे़
हद्दवाढ झाल्यास भार वाढणार
धुळे महापालिकेच्या हद्दवाढीचा अंतिम प्रस्ताव शासनाला सादर असून हद्दवाढ कधीही लागू होऊ शकते़ पुढील वर्षी होणारी महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन तत्पूर्वी हद्दवाढ होण्याची शक्यता आहे. हद्दवाढ झाल्यास संपूर्ण वाढीव क्षेत्रांची प्रभाग रचना होऊन नगरसेवकांची संख्यादेखील वाढू शकते़ त्यामुळे मनपावरील आर्थिक भारही वाढणार आहे़
महापालिकेचे ७५ नगरसेवक़़
धुळे महापालिकेची सदस्य संख्या स्वीकृत सदस्यांसह ७५ असून राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे़ त्यापैकी ३६ नगरसेवक राष्ट्रवादीचे, ९ नगरसेवक शहर विकास आघाडीचे, ३ नगरसेवक समाजवादी पाटीर्चे, ७ नगरसेवक काँग्रेसचे, ११ नगरसेवक शिवसेनेचे व ३ नगरसेवक भाजपचे, १ नगरसेवक बहुजन समाज पाटीर्चा आणि ५ नगरसेवक स्वीकृत सदस्य आहेत़ त्यांच्या मानधनात प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे़