आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:58 PM2020-05-20T20:58:06+5:302020-05-20T20:58:30+5:30
जिल्हाधिकारी : पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्याची पूर्वतयारी आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करीत या समित्यांची तत्काळ बैठक घेवून आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले़
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती, पूरनियंत्रण, वादळ आदींबाबत मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपवनसंरक्षक डी. बी. शेंडगे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यातच एक जूनपासून सर्व विभागांना पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींसाठी तयार राहावे लागेल. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे.
आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी करून ती तपासून घ्यावी. आवश्यकता भासल्यास मॉक ड्रील करुन घ्यावे. मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. तसेच हा कक्ष २४ तास कार्यान्वित राहील, अशी दक्षता घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकेदायक इमारतींचे सर्वेक्षण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दळण- वळणाची सुविधा कायम राहील, असे नियोजन करीत जिल्ह्यातील पुलांची तपासणी करून घ्यावी.
जिल्हा पुरवठा विभागाने नागरिकांपर्यंत वेळेत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावांना सतर्क करावे. धरणातील जलसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज सादर करावी.
याशिवाय जलविसर्गाचा आराखडा सादर करावा. आपत्ती निवारणासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची माहिती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोनासोबतच आता पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करावा लागणार आहे़
मुख्यालयी थांबण्याचे आदेश
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजना आणि आगामी पावसाळा या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांनी मुख्यालयी थांबावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड दिल्या़
गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. सर्व धरणे भरली होती. धुळे शहरातून वाहणाºया पांझरा नदीला पूर आला. अशा परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वय ठेवत आपत्तीचे निवारण केल्याची आठवण त्यांनी करुन दिली़
तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सादर केला.