मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:32 PM2019-04-10T21:32:49+5:302019-04-10T21:35:14+5:30
महापालिका : हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित, अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण
धुळे : शहरातील मु्ख्य रस्त्यांवर अतिक्रमण करुन फेरीवाले, हॉकर्ससह विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहे़ त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहे़
हॉकर्स झोनच्या प्रश्नावर चर्चा होऊन पाच जागा निश्चित करण्यात आल्या होत्या़ मात्र हॉकर्स झोनच्या प्रश्नाबाबत मनपाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हॉकर्सची वाढती संख्या मनपासाठी भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकते़
यापुर्वी शहर फेरीवाला समितीची बैठकीत घेण्यात आली. समिती सदस्यांनी चर्चेअंती पाच जागा निश्चित केल्या, त्यात साक्रीरोड वरील हॉकर्ससाठी मनपा शाळा क्रमांक १४, नकाणे रोड-जयहिंद कॉलनी व परिसरातील हॉकर्ससाठी आनंद नगरातील मनपाची मोकळी जागा, इंदिरा उद्यान परिसरातील फळविके्रते व अन्य हॉकर्ससाठी इंदिरा उद्यानामागील बोळ, दत्तमंदिर परिसरातील हॉकर्ससाठी नवरंग जलकुंभाशेजारील जागेऐवजी सुदर्शन कॉलनी येथील मोकळी जागा आणि मोहाडी परिसरातील हॉकर्ससाठी दसेरा मैदानाची जागा निश्चिती झाली होती़ मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागलाच नाही़
मनपाचे आर्थिक नुकसान
महापालिका प्रशासनाकडून शहरातील व्यावसायिकांना हक्काची जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे़ ते महापालिकेचे दैनदिन बाजार शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे दरवर्षी मनपाच्या बाजार समिती विभागाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते़
प्रशाासन अपयशी
हॉकर्सकडून मुख्य रस्त्यांवर होत असलेले अतिक्रमण वाढतच आहे़ संपूर्ण नियोजनानिशी व पूर्ण यंत्रणा कार्यान्वित केल्यास हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागू शकतो़ मात्र कोणत्याही सुविधा न पुरविता केवळ आखणी करून मनपा प्रशासनाकडून हॉकर्सच्या पुनर्वसनाचा घाट घातला जात असल्याने प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येते़
शहरातील काही गुंडांनी इलेक्ट्रीक खांब, झाडांच्या आधाराने अतिक्रमणे केली आहेत़ तसेच रस्त्यांवर अतिक्रमण करून विकत घेतलेल्या जागेपेक्षा अधिकची जागा बळकाविली आहे़ कॉलनी परिसरात देखील अतिक्रमण करून रहदारीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत़
हॉकर्स झोनचा प्रश्न सुटेना!
फेरीवाल्यांची नोंदणी, बाजार शुल्क वसुलीचा तगादा लावला जात असला तरी प्रत्यक्षात हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस कारवाई झालेली नाही़ शहर फेरीवाला समितीची बैठक वर्षाभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही झालेली नाही.