वीज कनेक्शन तोडल्या रागातून अभियंता आणि कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:11 PM2024-01-06T17:11:58+5:302024-01-06T17:12:13+5:30

रतनपुरा ता.धुळे येथील घटना.

engineer and the employee were beaten out of anger after cutting the electricity connection | वीज कनेक्शन तोडल्या रागातून अभियंता आणि कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

वीज कनेक्शन तोडल्या रागातून अभियंता आणि कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

राजेंद्र शर्मा,धुळे : वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून वीज कंपनीच्या शिरुड शाखेच्या सहायक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. शासकीय कामात अडथळा आणण्यात आला होता. ही घटना धुळे तालुक्यातील रतनपुरा गावात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल होताच वसंत जगन्नाथ चौधरी (वय ४७) याला अटक करण्यात आली. वीज वितरण कंपनीचे शिरुड कक्षाचे सहायक अभियंता तुषार प्रकाश महाजन (वय ४२, रा. गोपाळनगर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार धुळे तालुक्यातील रतनपुरा गावात वीज कंपनीचे पथक थकबाकीदारांकडे जाऊन बिल भरण्याबाबत आवाहन करत होते.

ज्यांच्याकडे वारंवार चकरा मारूनसुद्धा वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू होते. गावातीलच वसंत जगन्नाथ चौधरी यांच्याकडे वीज कंपनीची थकबाकी असल्याने पथकाने त्यांच्या घराचे कनेक्शन तोडले आणि तातडीने बिल भरण्याची सूचना केली. बिल भरल्यानंतर कनेक्शन पुन्हा जोडले जाईल, असेही सांगण्यात आले. परंतु, कनेक्शन का तोडले? असा जाब विचारत वसंत चौधरी याने पथकाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करत वाद घातला.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वसंत चौधरी याने हाताबुक्क्यांसह ठिबकच्या नळीने अधिकारी व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता रतनपुरा गावात घडली. यात सहायक अभियंता तुषार महाजन आणि कर्मचारी विवेक दयाराम सोनवणे यांना दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी वसंत जगन्नाथ चौधरी (वय ४७, रा. रतनपुरा, ता. धुळे) याच्याविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, ५०४, ५०६ प्रमाणे शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल होताच वसंत जगन्नाथ चौधरी याला अटक करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश बोरसे घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: engineer and the employee were beaten out of anger after cutting the electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.