शहरात श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:28 PM2019-04-13T22:28:36+5:302019-04-13T22:29:36+5:30
महाप्रसादाचे वाटप : शहरात विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य मोटारसायकल रॅली
धुळे : शहरात श्रीरामाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला़ त्यानिमित्त विश्व हिंदू परिषदतर्फे शहरात भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती़
शहरातील श्रीराम मंदिर आकर्षक सजावट करण्यात आली होती़ सकाळी १० वाजेपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती़ दुपारी फुलांच्या पाकळ्या, अक्षतांची उधळण करीत श्रीरामाचा जयघोष करीत उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.
जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर संस्थानास सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. येथे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येते. रामनवमीनिमित्त मंदिरात व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आलेली होती. शनिवारी सकाळी १० वाजेपासून भाविकांची गर्दी होऊ लागली. लहान पाळण्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या चांदीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांनी फुलांच्या पाकळ्या, अक्षतांची उधळण करीत श्रीरामाचा जयघोष केला. याठिकाणी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केळी, साबुदाण्याची खिचडी वाटपाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेऊन, या भागातून फुलवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केलेली होती.
सुभाष नगरातील राममंदिर
जुने धुळ्यातील सुभाषनगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या मंदिरातही फुलांची सजावट केलेली होती. उत्सव मूर्तींना सजविण्यात आले होते. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. स्थानिक खान्देश वारकरी भजनी मंडळांनी सादर केलेल्या विविध भजनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
खोल गल्ली
श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. राम नवमीनिमित्त मंदिर परिसरात विविध भक्तीगीतांची धून लावण्यात आलेली होती. त्यामुळे वातावरण भक्तिमय झालेले होते.
निजामपूर येथे जन्मोत्सव साजरा
निजामपूर येथे विठ्ठल मंदिर व श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी श्रीरामच्या मूतीर्ला महाअभिषेक होऊन विधीवत पूजा करण्यात आली. विठ्ठल मंदिर संस्थानचे राजेंद्र उपासनी यांनी प्रवचन तर सुमनबाई पाटील यांनी भक्ती गीते गायिली. राजेंद्र राणे व स्नेहल राणे यांनी महाआरती केली. श्रीराम मंदिरात ह भ प व विठ्ठल मंदिर संस्थांनचे राजेंद्र उपासनी यांनी रामायण निरूपण केले. यशस्वीतेसाठी हभप राजेंद्र उपासनी, भास्कर उपासनी, श्रीराम उपासनी, तुषार उपासनी, भगवान उपासनी, वंदना उपासनी, तेजस्विनी उपासनी, पूजा उपासनी, तेजल उपासनी आदींनी परिश्रम घेतले़
मालपुर येथे श्रीराम जन्मोत्सव शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात तसेच बसस्थानका शेजारील संत वाल्मिक ऋषी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामाची जन्म उत्सवाची कथा वेदमूर्ती रघुनाथ शास्त्री पुराणिक यांच्या श्रीमुखाने गावातील सर्व ग्रामस्थांनी श्रवण करुन भजन किर्तनासहीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
येथील संत वाल्मिक ऋषी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अभिषेक, पुजा, अर्चा करून गावातील भजनी मंडळानी एकत्रित येऊन सामुहिक भजने, गवळणी, भारूडे यावेळी सादर करण्यात आली. यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
लक्षवेधी रॅली
श्रीराम नवमीनिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आल्या. या रॅलींनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. विश्व हिंदू परिषदेच्या उत्सव समितीतर्फे शनिवारी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आली. रॅलीत एका चारचाकी वाहनावर भगवान श्रीराम यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ दुचाकीस्वार होते.
अनेकांच्या दुचाकीला भलेमोठे भगवे ध्वज लावण्यात आले होते. ‘जय श्रीरामा’चा जयघोष करीत ही रॅली शहराच्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत होती. या रॅलीत शहरातील शेकडो तरुण सहभागी झाले होते.