मंगलमय वातावरणात झाली महालक्ष्मींची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:38 PM2019-09-05T22:38:39+5:302019-09-05T22:38:54+5:30
धुळे : तीन दिवसांचा उत्सव, गौरींची दागिन्यांनी केली सजावट, महिलांनी केले पारंपारीक गितांचे सादरीकरण
धुळे : महालक्ष्मी अर्थातच गौरी उत्सवाच्या आज पहिल्यादिवशी परंपरेनुसार शहरातील विविध परिसरात ‘गौरी सोनपावलानं ये’ अशी आर्त साद घालत अनेक भाविकांनी त्यांच्या घरी गौरीची विधिवत स्थापना केली.
परंपरेनुसार महालक्ष्मीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. त्यानुसार गुरूवारी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली. शहरातील अनेक भाविकांनी त्यांच्या घरी धातूची मूर्ती, मातीची मूर्ती, कागदावरचे चित्र व पाच लहान खडे अथवा मुखवट्यांचे पूजन केले़
पारंपरिक गीतांचे सादरीकरण
महालक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर त्या दिवशी पारंपरिक गीतांचे सादरीकरण करण्याची परंपरा आहे. महालक्ष्मीच्या स्थापनेनंतर अनेक घरातील महिला पारंपरिक गीते गाताना दिसून आल्या.
दागिन्यांनी केली सजावट
गौरीची ज्या ठिकाणी स्थापना केली आहे, त्याठिकाणी गहू, तांदूळ, कडधान्य, करंज्या आदी साहित्याचा नैवेद्य दाखविण्यात येतो. गौरी हे महालक्ष्मीचे रूप आहे. या उत्सवात महालक्ष्मीला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजविण्यात आले. अनेक घरांमध्ये गौरीच्या अंगावर एकदाणी मोत्यांच्या हार, ठुशी, लक्ष्मीहार, वाकी, बाजूबंद पट्टा, मोत्यांचे हार, कमर पट्टा, बाजूबंद हार, गौरी मुकूट, नथ आदी दागिने व इतर शोभिवंत वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे.
तीन दिवसांचा उत्सव
गुरूवारी स्थापनेनंतर दुसºया दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी अभ्यंगस्रान करून ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींची समोर मांडलेल्या बाळासमवेत पूजा केली जाणार आहे. या वेळी दोन गौरींमध्ये गणपती बाप्पा यांना बसविले जाते. यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात काहींच्या घरी रात्र जागून काढण्यात येते. अशा वेळी महिलांचे पारंपरिक खेळदेखील खेळण्याची प्रथा जिल्ह्यात आहे. दरम्यान गणपती पाठोपाठ गौरींचेही आगमन झाल्याने, सर्वत्र उत्साह आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरी-गणपतीनिमित्त बाहेरगावी असलेली मंडळी गावी आलेली आहे.
ंमहालक्ष्मीला आज नैवेद्य दाखविणार
*शुक्रवारी गौरी पूजनाचा दिवस आहे. या दिवशी गौरीला आरोग्यदायी १६ विविध भाज्यांचा नेवैद्य दाखविण्यात येतो. गौरीच्या नैवेद्यामध्ये एकूण १६ प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. त्यात भोपळा, चुका, मुळा, करडई, पालक, मटार, श्रावण घेवडा, पडवळ, गवार, भेंडी, मेथी, आळू, फुलकोबी अशा १६ भाज्या एकत्र करतात.
*त्यासोबत डाळ, शेंगदाणा, हरभरा डाळ, तीळ, खोबरा यांची चटणी, डाळ्यांपासून बनविलेले मेतकुट, पंचामृत, टमाटा, केळी, काकडी यांच्या कोशिंबिरीचा समावेश असतो. तसेच गौरीसमोर विविध पदार्थ ठेवले जातात. त्यामुळे गुरूवारी बाजारात भाज्या व पूजा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.