घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 01:14 PM2019-09-29T13:14:04+5:302019-09-29T13:14:35+5:30
लाखोंची उलाढाल । घटांना मागणी वाढली, मूर्तींच्या दरात किरकोळ वाढ, मंदिरांवर विद्युत रोषणाई
धुळे :गणेशोत्सवापाठोपाठ जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने साजऱ्या होणाºया नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठेत दुर्गामातेच्या मूर्तींसह पूजा साहित्य व विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यातून लाखोंची उलाढाल झाली.
शहरातील जुने सिव्हील रूग्णालय परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.औरंगाबाद, साक्री, नेर येथूनही मूर्ती मागविण्यात आलेल्या आहेत. यावर्षीही मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्यांनी वाढ झालेली आहे. साधारत: ६०० रूपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंत मूर्तींची किंमत असल्याचे मूर्ती विक्रेता राजेंद्र कासार यांनी सांगितले.
बाजारात शनिवारी पूजा, पोशाख खरेदीसाठी गर्दी झाली होती. नवरात्रोत्सव म्हटला म्हणजे गरबा, दांडिया आलाच. दांडिया खेळण्यासाठी संपूर्ण साज-श्रृंगार खरेदीकडे तरूणींचा कल असतो. बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये राजस्थानी, गुजराथी पेहराव, दागिने दुकानांच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले आहेत. दांडिया खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मैदानाची साफसफाई करून, मंडप उभारणीचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रविवारी घटस्थापना होत असली तरी सोमवारपासूनच गरबा, दांडिया खेळल्या जातील असे काही सार्वजनिक दुर्गाेत्सव मंडळांतर्फे सांगण्यात येत आहे.अनेक सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचे काम वेगात करण्यात येत आहे. पितृपक्षात बाजारपेठेत विविध वस्तू खरीदणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती. परंतु नवरात्रोत्सवाच्या शुभमुहुर्तावर अनेकजण वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करीत असतात. ग्राहकांच्या सेवेसाठी दुकानदारही सज्ज झालेले आहेत. विविध वस्तू, साहित्याच्या किंमती, त्यावर सवलत, उपलब्धता याची माहिती घेण्यासाठी मोठ्या दुकानांवर गर्दी झाली होती. शहरातील आग्रारोडसह देवपूर परिसरात वाडीभोकर रोड, नकाणे रोड, साक्रीरोड, मालेगाव रोड या परिसरात दुर्गामातेच्या मूर्ती व पूजा साहित्याच्या खरेदीसाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित बाजारात आले होते. त्यामुळे या रस्त्यांना सायंकाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या उत्सवानिमित्ताने शहरात सर्वत्र उत्साह व चैतन्याचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी मातीचे घट, धूपारतीसाठी मातीचा दिवा, लाल मद्रा यासह विविध पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पूजेसाठी झेंडुच्या फुलांनाही मोठी मागणी होती.