७५ वर्षानंतरही... प्रसूतिकळा सुरू झाल्यावर झोळीतून 6 किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:23 AM2023-07-16T07:23:29+5:302023-07-16T07:24:08+5:30

सातपुड्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेपासून वंचितच

Even after 75 years... 6 km journey from Jholi after maternity starts india | ७५ वर्षानंतरही... प्रसूतिकळा सुरू झाल्यावर झोळीतून 6 किमी प्रवास

७५ वर्षानंतरही... प्रसूतिकळा सुरू झाल्यावर झोळीतून 6 किमी प्रवास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोराडी (जि. धुळे) : शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायतीतील  थुवाणपाणी गावात रस्त्याची सोय नसल्याने प्रसूतीकळा सुरु झालेल्या महिलेला बांबूची झोळी करून सहा किलोमीटरची पायपीट करत गुऱ्हाळपाणी येथे आणून  वाकवाड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी  घडला. याठिकाणी प्रसूती झाली असून बाळ आणि महिला दोघे सुखरूप आहेत.

शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवाणपाणी व निशाणपाणी या गावात  जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. शनिवारी या गावातील लालबाई मोतीराम पावरा (३४) या गरोदर महिलेला प्रसूतीकळा होऊ लागल्याने तिला प्रसूतीसाठी नातेवाईकांनी बांबूची झोळी बनवून तिला निशाणपाणी ते थुवाणपाणी आणि तेथून गुऱ्हाळपाणी असे ६ किलोमीटरचे अंतर पायपीट करत आणले. त्यानंतर तेथून या महिलेला रुग्णवाहिकेने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिची सुरक्षितरीत्या प्रसूती होऊन बाळ झाले. बाळ आणि त्या महिलेची प्रकृती ठीक आहे.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.

सीईओंच्या भेटीनंतरही हालच
चार महिन्यापूर्वी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना देखील थुवाणपाणी पर्यंत पायी चालत यावे लागले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही रस्त्याबाबत काही कार्यवाही न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायमच आहे. 

गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दहा ते बारा खेडी येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र, याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही. 
- राजेंद्रसिंग पावरा, माजी ग्रामपंचायत सदस्य, गुऱ्हाळपाणी

Web Title: Even after 75 years... 6 km journey from Jholi after maternity starts india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.