५० हजारांची खंडणी देऊनही जीवे मारण्याचा प्रकार चव्हाट्यावर
By देवेंद्र पाठक | Published: November 16, 2023 04:30 PM2023-11-16T16:30:23+5:302023-11-16T16:32:25+5:30
खंडणी देऊनही चॅटिंग व्हायरल करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार धुळे तालुक्यातील एका गावात घडला.
धुळे : वहिनी आणि दिराची मोबाइलवर झालेली चॅटिंग पतीसह इतरांना दाखविण्याची धमकी देत पीडितेकडून ५० ते ६० हजारांची खंडणी मागितली. ही खंडणी देऊनही चॅटिंग व्हायरल करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार धुळे तालुक्यातील एका गावात घडला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला आणि तिचा दीर यांच्यात व्हॉटस्ॲप चॅटिंग झाली होती. हा प्रकार एकाने शोधून काढत पीडित महिलेला धमकी देण्यास सुरूवात केली. ही चॅटिंग महिलेच्या पतीसह गावातील व्हॉटस्ॲप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडू लागला. २९ मे २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. सातत्याने चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याने पीडित महिलेने संशयितांना पैसे दिले. यानंतरही चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याने पीडित महिलेने धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात सोमवारी रात्री साडेदहा वाजता भादंवि कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक देवरे करत आहेत.