...अखेर इनकॅमेरा शवविच्छेदन

By Admin | Published: January 28, 2015 01:52 PM2015-01-28T13:52:49+5:302015-01-28T13:52:49+5:30

भारतीय जनता पार्टीचे धुळे तालुका सरचिटणीस अमर पाटील यांचा नाशिक येथे विवाह समारंभासाठी जात असताना रस्त्यात मृत्यू झाला.

... eventually the incubation of an incarcera | ...अखेर इनकॅमेरा शवविच्छेदन

...अखेर इनकॅमेरा शवविच्छेदन

googlenewsNext

 धुळे : भारतीय जनता पार्टीचे धुळे तालुका सरचिटणीस अमर पाटील यांचा नाशिक येथे विवाह समारंभासाठी जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांचे शवविच्छेदन इनकॅमेरा झाले पाहिजे, अशी मागणी भाजप पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी लावून धरली. त्यास पोलीस अधीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर मृतदेहाचे 'इनकॅमेरा' विच्छेदन केले गेले.
लग्नासाठी रवाना
माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मुलाचे नाशिक येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी लग्न होते. त्यासाठी बजरंग दलाचे माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य अमर दामोदर पाटील आपल्या हितचिंतकांसोबत नाशिककडे रवाना झाले. मात्र प्रवासातच सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चांदवडनजीक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रक्ताची उलटी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरूअसताना त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू झाल्याची वार्ता लगेचच फागणे येथील त्यांच्या राहत्या घरी आणि गावात पसरली. 
अमर पाटील रुग्णालयात
चांदवड येथून अमर पाटील यांचा मृतदेह धुळे येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्या वेळी प्राथमिक स्थिती बघितली असता गुडघ्याजवळ त्यांची पँट फाटलेली होती आणि त्यांचा बनियन मातीने माखलेला होता. यामुळे त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आला. तेव्हा त्यांच्या मृतदेहाचे इनकॅमेरा विच्छेदन करण्याची मागणी नाना कदम, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, संदीप चौधरी, विनोद खाडे, विशाल विसपुते, आनंद शेंद्रे आदी कार्यकर्त्यांनी लावून धरली. त्यांनी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेतली. 
अधिकार्‍यांमध्ये संवाद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. गुप्ता यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर इनकॅमेरा शवविच्छेदनास मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.अनंत बोर्डे यांच्यासह प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक शिंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. 
पदाधिकार्‍यांची उपस्थिती
भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, संजय शर्मा, अनुप अग्रवाल, रामकृष्ण खलाणे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, प्रा.अरविंद जाधव, हिलाल माळी, नाना कदम, अँड.अमित दुसाने यांनी जिल्हा रुग्णालयात उपस्थिती दिली. अमर पाटील हे सुरुवातीपासून हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले गेले. बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्या संपर्कात आले. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले. त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीशी जुळले गेले. भाजपातर्फे ते ग्रामपंचायत सदस्य झाले. पंचायत समितीच्या निवडणुकीत अवघ्या ७ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते भाजपाचे धुळे तालुका सरचिटणीस होते. अहवालाची प्रतीक्षा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अमर पाटील यांचे शवविच्छेदन इनकॅमेरा केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल सात ते आठ दिवसांनी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला आहे, घातपात तर नाही ना, या सर्वांची उत्तरे मिळतील अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.बोर्डे यांनी दिली. 
फागण्यात अंत्यसंस्कार
अमर पाटील हे फागण्याचे असल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर फागणे येथे नेण्यात आला. फागणे येथे मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले.

Web Title: ... eventually the incubation of an incarcera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.