प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 05:55 PM2019-02-16T17:55:29+5:302019-02-16T17:57:02+5:30

धुळ्यातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

 Every tear will be calculated | प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाईल

dhule

Next

धुळे - पुलवामा येथे झालेल्या घटनेने देश आक्रोषित आहे. देशवासी रागात असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या प्रत्येक आश्रुचा हिशेब घेतला जाईल. हा नवीन रिती व नितीचा भारत देश आहे, याचा अनुभव आता संपूर्ण जगाला होईल. भारताची नेहमीची रित राहिली आहे की आम्ही कोणाला छेडत नाही. पण जर कोणी छेडले तर आम्ही त्याला सोडतही नाही. आम्ही ते आधीही करुन दाखविले आहे. आताही करुन दाखवू यासाठी कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात आयोजित जाहीर सभेत बोलताना पाकिस्तानाला नाव न घेता दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे - नरडाणा रेल्वे मार्ग, सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेचा शुभारंभ आणि अक्कलपाडा धरणाच्या लोकार्पण करण्यात आले. तसेच भुसावळ, नंदुरबार आणि उधना या रेल्ेव स्थानकावरुन सुटणाऱ्या तीन नवीन रेल्वे गाडयांचा सभा स्थळावरुन व्हिडीओ लिंक वरुन हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरत रेल्वेस्थानकावर रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपन या तीनही ठिकाणी दाखविण्यात आले.
धुळ्यातील मालेगावरोडवरील गोशाळेच्या मैदानावर आयोजित सभेस राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ता परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार ए.टी.पाटील, महापौर चंद्रकांत सोनार हे यावेळी उपस्थित होते.
सभेला सुरुवातीला सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. कुठल्याही प्रकारचा स्वागतचा कार्यक्रम न करता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १२० वर्षापूर्वी धुळे - चाळीसगाव रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर आता धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. तसेच सुलवाडे - जामफळ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील १०० गावांचा फायदा मिळणार असून यामुळे धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. सध्या महाराष्टÑात दुष्काळाचे संकट असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला. हा सिंचन प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने ६० वर्ष केवळ चर्चा केली. मात्र आम्ही तो प्रत्यक्षात साकार करणार आहोत. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईप लाईन टाकण्याची योजनेचे आज भूमीपूजन केले. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करुन चार महिन्यात ५०० कोटीचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.
सभेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी प्रास्ताविक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणे सुमारे २५ मिनिटाचे झाले. सभेनंतर हेलिकॉप्टरने पंतप्रधान पुन्हा जळगावकडे रवाना झाले.

Web Title:  Every tear will be calculated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.