माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:07 PM2019-01-02T21:07:36+5:302019-01-02T21:08:06+5:30
डॉ. पा.रा. घोगरे महाविद्यालय : ३० वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी, विविध विषयांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तीस वर्षांपूर्वी डॉ. पा.रा. घोगरे महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमिलन मेळावा नुकताच महाविद्यालयात झाला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस.टी. पाटील, रवींद्र काकडे, संभाजी राजपूत, गीता निकम, ज्योत्सना विसपुते, प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, प्रा. अे.एस. पवार, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. एस.टी. पाटील म्हणाले, महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून, त्यातंनी त्यासाठी योगदान देवून सहकार्य करावे. प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील म्हणाले, आपल्या अनुभवाची शिदोरी सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. प्रमोद पाटील म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनीही आपले ज्ञान, माहिती, अनुभव इतरांना प्रदान करून त्यांच्या यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करावे. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करतांना अनेकांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा. के.एम. बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. चेतन पाटील, डॉ. दत्ता ढाले, प्रा. अमित बिरारीस यांनी परिश्रम घेतले.