भरारी पथकाद्वारे पोषण आहाराची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:08 PM2019-09-10T23:08:34+5:302019-09-10T23:09:20+5:30
मालपूर परिसर : शासन निर्णय, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही; आहाराचा दर्जा वाढविण्याची मागणी
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील पोषण आहारासंदर्भात वाढलेल्या तक्रारी लक्षात घेता नवनियुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करुन शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराचा दर्जा सुधारावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
मध्यान्ह भोजन म्हणून प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार व दुष्काळी भाग म्हणून सध्या पुरक पोषण आहारांचे देखील सर्वत्र शिजवण वाटप होत असते. मात्र याचा दर्जा व पोषण आहार वाटपाच्या प्रत्यक्ष शाळेवरील पद्धती यांच्यात दिवसेंदिवस वाढत्या तक्रारी येत असल्याचे पालकवर्ग सांगतात. यासाठी खास भरारी पथकांची नियुक्ती करुन पोषण आहाराची तपासणी करावी, हा शासन निर्णय झालेला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागात यावर्षी ‘खिचडी’ कोणाकडे याचाच जास्त खल शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी शाळेत होत असतो. यासाठी वरुन फिल्डींग लावल्याची देखील शिक्षकांमध्ये चर्चा होते. म्हणून विद्यार्थ्यांना आहाराचे कमी वाटप करणे, निकृष्ठ आहार मुलांना देणे, तांदुळ व धान्यादी माल याचा शाळेमध्ये उपलब्ध प्रत्यक्ष साठा व नोंदवहितील नोंदी यांच्यात तफावत, बाजारात विक्री, घरी घेवून जाणे आदींची सखोल चौकशी करावी, अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.
सध्या पुरक आहारांच्या नावाखाली तर शिक्षक बाजारातच हिंडतांना दिसून येतात. अध्यापन मुख्य हेतु बाजुला करुन ह्या उद्योगामुळे याचा गुणवत्तेवर परिणाम दिसून येत आहे आणि शिवाय वाटपांच्या चुकीच्या पद्धतीमुळे झुंडीच्या झुंडी एकत्र गर्दी करतात. परिणामी खाली पडलेला पोषण आहार तसेच निकृष्ठ खाण्यायोग्य नसलेला विद्यार्थ्यांनी फेकून दिलेल्या पोषण आहारामुळे गावातील वराहांचा शाळेत मुक्त संचार दिसून येतो. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा सगळा बोजवारा उडालेला दृष्टीपथास पडतो.
पुरक पोषण आहारांतर्गत मालपूर येथे अंडी व केळी दिली जात असल्याचे दिसून येते. मात्र चुकीच्या वाटप पद्धतीमुळे काही ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतोच असे नाही. म्हणून एकदा याची भरारी पथकाने तपासणी करुन दर्जा व वाटपाच्या पद्धती सुधाराव्या, अशी येथील पालकवर्गाची मागणी आहे.