धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा वगळता उर्वरित तालुके टंचाई मुक्त
By अतुल जोशी | Published: October 9, 2023 03:05 PM2023-10-09T15:05:50+5:302023-10-09T15:06:53+5:30
जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र ॲागस्ट महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारली.
धुळे : पाणी टंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील १४४ गावांमध्ये विहिर अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलस्त्रोताची समस्या काही प्रमाणात सुटलेली आहे. जिल्ह्यात आता फक्त शिंदखेडा२८ गावांसाठी विहिर अधिग्रहित व एक टँकर सुरू आहे. उर्वरित धुळे, साक्री, शिरपूर तालुक्यातील ११६ विहिर अधिग्रहित मुक्त झालेले आहे.
जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्रॲागस्ट महिन्यात तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारली. पावसाअभावी जलस्त्रोतही आटले. परिणामी अनेक गावांना पाणी टंचाईची तीव्रता वाढली. यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत धुळे तालुक्यासाठी १७, साक्री तालुक्यासाठी ८२ शिरपूर तालुक्यासाठी पाच तर शिंदखेडा तालुक्यासाठी ३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.सप्टेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे विहिरींची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली. अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरेत सोडल्याने, पांझरा काठावर असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहरींमध्येही पाणी पातळी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने दिलासा दिल्याने, धुळ्यासह साक्री, शिरपूर तालुक्यातील गावे विहिर अधिग्रहण मुक्त झालेले आहे. तर आता फक्त शिंदखेडा तालुक्यातच पाणी टंचाई असून, अॲाक्टोबर महिन्यातही या तालुक्यातील २८ गावांसाठी विहिर अधिग्रहित कायम आहे. तर तालुक्यातील धावडे गावाला अजुनही टँकरद्वारेच पाणी पुरवठा होत आहे.