नवरात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहास उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:23 PM2019-10-05T23:23:43+5:302019-10-05T23:24:23+5:30
सोनशेलू येथील चामुंडा मंदिरातर्फे रक्तदान शिबिर। पेडकाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
शिंदखेडा/कापडणे : तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त रविवार ६ रोजी अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसाद तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज तसेच चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिरावर दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील चामुंडा मातेचे मंदिर जागृत देवस्थान असून येथे राज्यासह परराज्यातून समाजबांधवांबरोबरच पंचक्रोषितील नागरीक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.
सालाबादाप्रमाणे यंदाही रविवार ६ रोजी चामुंडा मातेच्या मंदिरावर सकाळी ९ वाजता होमहवन, १०.३० वाजता महाआरती व ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलू व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बडगुजर प्राऊड ग्रुप, सरस्वती मिशन संस्था व नवोदय युवा मंच यांच्या सहकार्याने सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पेडकाई देवी मंदिर २४ तास खुले
कापडणे - खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती पेडकाई माता मंदिरावर नवरात्र उत्सवाच्या प्रारंभापासून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. खानदेशातील ३३ कुळांच्या कुलदैवत असणाऱ्या पेडकाई माता मंदिरावर नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागली आहे. पेडकाई मातेचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले करण्यात आले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सत्तरसिंह गिरासे व सचिव प्रा.भरत काळे यांनी दिली.
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावापासून ५ किलोमीटर अंतरावर सोनगीर - दोंडाईचा रोडावर डोंगरात आदिशक्ती आई कुलस्वामिनी पेडकाईचे भव्यदिव्य मंदिर साकारले गेले आहे व मंदिराला आता नवी झळाळी मिळाली आहे.