धुळ्यातील यल्लम्मा देवी मंदिरातील चोरी शिताफीने उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:01 PM2018-08-28T22:01:31+5:302018-08-28T22:02:39+5:30
चाळीसगाव रोड पोलीस : संशयित जेरबंद, कबुली देत काढून दिला मुद्देमाल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मालेगाव रोडवरील यल्लम्मा माता मंदिरात १७ आॅगस्ट रोजी पहाटे झालेली चोरी शिताफिने उघड करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे़ मुद्देमालासह एकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याने चोरुन नेलेला ऐवज काढून दिला आहे़
शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते दसेरा मैदानादरम्यान एल्लम्मा देवी मंदिर आहे़ मंदिरात सध्या फर्निचर तयार करण्याचे काम सुरु होते़ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडी टेबल लावण्यात आले होते़ चोरट्याने त्याचा फायदा घेत मंदिरात सहजपणे प्रवेश केला होता़ चोरट्याने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात ते कैद झाले होते़
चाळीसगाव रोड पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पथकासह दाखल झाले होते़ त्यासोबत श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वानाने अग्रवाल नगर, आदिवासी कार्यालयजवळील चार रस्तापर्यंत माग दाखविला होता़
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़ पोलिसांचा तपास सुरु असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अबरार अहमद मोहम्मद आरिफ अन्सारी (३२, रा़ वडजाई रोड, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता चोरलेला ऐवज त्याने काढून दिला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे, राजेश इंदवे, हेड कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस नाईक संदिप कढरे, पोलीस कर्मचारी जोएब पठाण, प्रेमराज पाटील, हेमंत पवार, सुशील शेंडे यांनी कारवाई केली़