धुळे जिल्ह्यात ‘अतिवृष्टी’चा १४४६ हेक्टरला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:27 AM2020-09-09T11:27:52+5:302020-09-09T11:28:14+5:30
महसूल यंत्रणेला पंचनाम्याच्या सूचना
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धुळे व साक्री तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील एकूण २६ गावांमधील सुमारे १ हजार ४४६.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल यंत्रणेला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला ४ व ५ या तारखांना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्याचा सर्वाधिक फटका धुळे तालुका व साक्री तालुक्यातील पिकांना बसलेला आहे.
या दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील ९ गावांमधील सुमारे ७६३.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यात धुळे तालुक्यात मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तर साक्री तालुक्यातील १५ गावांमधील ६८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या तालुक्यातही मका व सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.
पंचनाम्याच्या सूचना
दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात नुकसान नाही
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला असला तरी या अतिवृष्टीमुळे शिंदखेडा व शिरपूर या दोन तालुक्यांमध्ये पिकांचे फारसे नुकसान झालेले नाही.