शिरपूर तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 04:46 PM2020-10-28T16:46:04+5:302020-10-28T16:46:36+5:30
पोलीसांना यश : दोन संशयितांना अटक, अन्य दोन फरार
धुळे : शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे छापा मारुन पोलीसांना बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. बनावट चलनी नोटा आणि यंत्रसामुग्री असा एकूण ४८ हजार रुपये किंमतीचा एवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी बुधवारी दुपारी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरपूर पोलीस यांनी संयुक्त कारवाइ करीत मंगळवारी हा छापा टाकला. कळमसरे येथे बनावट नोटा छापण्याचा कारखाना आणि गांजा असल्याची माहिती एलसीबीचे पीआय शिवाजी बुधवंत यांनी मिळाली होती. त्यानुसार कळमसरे येथे संतोष गुलाब बेलदार याच्या राहत्या घराच्या मागील खोलीत पोलीसांनी छापा टाकला. त्यावेळी संशयित बनावट नोटा जाळताना आढळून आले. पोलीसांनी याठिकाणी हुबेहुब दिसणाऱ्या दोनशे रुपयांच्या पाच चलनी नोटा, नोटा तयार करण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, कागद, कटर, कैची, काटकोन, स्केल पट्टी, हिरव्या व सिल्वर रंगाचे टीस्को टेप आदी ४८ हजार ३६० रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी संतोष गुलाब बेलादार रा. कळमसरे आणि गुलाब बाबु बेलदार या दोघांना पोलीसांनी अटक केली. अन्य दोन संशयित विनोद ऊर्फ मनोज जाधव रा. अजनाड बंगला आणि मंगल पंजबा बेलदार या दोघांचा शोध सुरू आहे.
गांभीयार्ने चौकशी करणार
बनावट चलनी नोटांचा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने या गुन्ह्याचा गांभीयार्ने तपास केला जाइल. यातील विनोद जाधव हा महा इ सेवा केंद्र चालक असून तांत्रिक गोष्टींची त्याला माहिती असावी. या टोळीला कोणी प्रशिक्षण दिले आहे का याचा शोध घेतला जाइल. शिवाय बनावट चलनी नोटांच्या या धंद्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक रॅकेट सक्रीय आहे किंवा कसे याचा शोध घेतला जाइल अशी माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.