धुळ्यात बनावट पत्रे तयार करण्याचा कारखाना ब्रेंडेड कंपनीच्या नावाने विक्री

By देवेंद्र पाठक | Published: December 4, 2023 05:30 PM2023-12-04T17:30:43+5:302023-12-04T17:31:30+5:30

ब्रँडेड कंपनीचे नाव वापरून बनावट पत्र्यांची निर्मिती : एलसीबीच्या कारवाईत २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

Factory selling fake letters in Dhula under branded company name in dhule | धुळ्यात बनावट पत्रे तयार करण्याचा कारखाना ब्रेंडेड कंपनीच्या नावाने विक्री

धुळ्यात बनावट पत्रे तयार करण्याचा कारखाना ब्रेंडेड कंपनीच्या नावाने विक्री

देवेंद्र पाठक, धुळे : शहरातील १०० फुटी रस्त्यावर एका पत्र्याच्या शेड मध्ये साधारण पत्रे तयार करून जिंदाल कंपनीचा बनावट शिक्का मारून त्याची विक्री करण्यात येत होती. ही बनावटगिरी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री छापा मारल्यानंतर उघडकीस आली. या ठिकाणाहून पोलिसांनी पत्रे, सिलिंगचे अन्य साहित्य तयार करण्याचे मशीन आणि बनावट शिक्के असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मुख्तार खान शहजाद खान (२९) या तरुणाला अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील शंभर फुटी रोड भागात स्मार्ट स्टील या दुकानांमध्ये साधारण पत्रे आणि सिलिंगचे साहित्य तयार करून त्यावर एका प्रतिष्ठित जिंदाल कंपनीचा शिक्का वापरून ते बनावट पत्रे कंपनीच्या नावाने विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्याठिकाणी मुख्तार खान शहजाद खान (वय २९, गरीब नवाज नगर, सार्वजनिक हॉस्पिटलजवळ, धुळे) हा तरुण एका मशीनद्वारे साधारण पत्रे तयार करून त्यावर निलकमल कंपनीच्या प्रिंटरने जिंदाल कंपनीचा बनावट शिक्का मारून ते बाजारात विक्री करीत होता. त्याच्याकडे जिंदाल नावाच्या शिक्का वापरण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. अधिक चौकशी केली असता जिंदाल या कंपनीचा स्टिल क्षेत्रात नावलौकिक असल्याने सदर नावाने हे बनावट पत्र्यांची आणि सिलिंगच्या अन्य साहित्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले.

दुकानातून लहान मोठ्या आकाराचा पत्रा, पत्र्याचे गोलाकार गाळे, सिलिंग पट्टा तयार करण्याचे मशीन आणि पत्रे असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी मुख्तार खान शहजाद खान याच्या विराेधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन आणि पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Factory selling fake letters in Dhula under branded company name in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.