जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती
By सचिन देव | Published: April 26, 2023 09:18 PM2023-04-26T21:18:27+5:302023-04-26T21:18:36+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तीन दिवस विशेष मोहीम
धुळे: राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी धुळ्यासह राज्यभरात बेकायदेशीर बनावट गावठी दारू अड्डे, हातभट्ट्या, तसेच विक्रेत्यांवर कारवाई मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर, धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे २५ ते २७ एप्रिल असे तीन दिवस विशेष कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यामध्ये तालुकानिहाय चार पथकांची स्थापना करण्यात आली असून, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शिंदखेडा व धुळे तालुक्यात टाकलेल्या धाडसत्रामध्ये सहा ठिकाणी बनावट देशी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.तर दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात सर्व ठिकाणी कारवाई मोहिम राबवून १२ गावठी दारू अड्डे उध्वस्त केले आहेत. दोन दिवसात असे १८ ठिकाणचे दारू
अड्डे उध्वस्त केले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले.
धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाई मोहिमेसाठी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. आर. धनवटे, डी. एल. दिंडकर, बी. आर. लांजेकर, बी. एस. चौथवे या अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक शिंदखेडा, शिरपूर, साक्री व दोंडाईचा या भागात जाऊन कारवाई मोहीम राबवित आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी या पथकाने शिंदखेडा तालुक्यासह धुळे तालुक्यातील वरखेडी, आर्णी व हर्णी गावांमध्ये धाडसत्र राबवून दारू अड्डे उद्ध्वस्त केले.
तसेच देशी-विदेशी दारू, बिअर व व्यवसायासाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त करून एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तीन जणांना अटक केली आहे. तसेच दुसऱ्या दिवशींही साक्री व धुळे तालुक्यात कारवाई मोहिम राबवून अनेक ठिकाणचे दारू अड्डे उध्वस्त करून ४० हजारांच्या घरात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याचे समजल्यावर दारू उत्पादक मुद्देमाल सोडून पळत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, पसार होणाऱ्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाईचे सत्र सुरू असल्याचे दिसून आले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागातर्फे बनावट देशी दारू अड्डे, हातभट्ट्या व इतर बेकायदेशीरपणे मद्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या गावांमध्ये असे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतील, तेथील नागरिकांनी राज्य उत्पादन शु्ल्क विभागाकडे माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवून, त्या गावातील बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात येतील.-मनोज शेवरे, अधीक्षक. धुळे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग.