बनावट जीएसटी अधिकारी प्रकरण, दोन पोलिसांसह महिलेला अटक; महामार्गावर केली होती लूट

By देवेंद्र पाठक | Published: February 1, 2024 03:52 PM2024-02-01T15:52:44+5:302024-02-01T15:52:52+5:30

दोन्ही पोलिस तडकाफडकी निलंबित

Fake GST officer case, woman arrested along with two cops; Robbery was done on the highway | बनावट जीएसटी अधिकारी प्रकरण, दोन पोलिसांसह महिलेला अटक; महामार्गावर केली होती लूट

बनावट जीएसटी अधिकारी प्रकरण, दोन पोलिसांसह महिलेला अटक; महामार्गावर केली होती लूट

देवेंद्र पाठक, धुळे: बनावट जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून महामार्गावर लूट करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलेचा समावेश असल्याचे चौकशीतून समोर आले. बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा. धुळे) आणि बिपिनची बहीण स्वाती रोशन पाटील (वय ३०) या तिघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंजाब येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (वय ५९) यांना मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्गावरून पीबी ११ सीझेड ०७५६ क्रमांकाचा ट्रक अनोळखी ४ जणांनी अडविला. आपण जीएसटी विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. १२ लाख ९६ हजारांच्या दंडाची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये गुगल पेच्या माध्यमातून स्वीकारून फसवणूक केली हाेती. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात ४ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना गुन्हा करण्याची पद्धत, तांत्रिक विश्लेषण करून बिपिन आनंदा पाटील (वय ४७), इम्रान ईसाक शेख (वय ५१) (दोघे रा. धुळे) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली. तर, बिपिन याची बहीण स्वाती रोशन पाटील हीचेही नाव समोर आले. अधिक चौकशी केली असता ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तपास सुरू असून आणखी आरोपींची नावे समोर येऊ शकतात. दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून खाते निहाय चौकशी केली जाईल. या प्रकरणात आजवर जे ऑनलाइन व्यवहार झाले आहेत ते सर्वाधिक एचडीएफसी बँकेतील आहेत. बिपिन याची बहीण स्वाती ही पूर्वी एचडीएफसी बँकेत काम करत असल्याचे तपासातून समोर आले आहे, असेही पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

Web Title: Fake GST officer case, woman arrested along with two cops; Robbery was done on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक