धुळ्यात बनावट दारू, कारसह १ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:23 AM2017-11-30T11:23:01+5:302017-11-30T11:24:29+5:30
एलसीबीने केली कारवाई, एक संशयित ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील शासकीय दूधडेअरी भागातील सहजिवन नगर येथे एलसीबीने छापा टाकत बनावट दारु बनविण्याचे साहित्य, अवैध दारु आणि कार असा एकूण १ लाख ७९ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे़
शासकीय दूधडेअरी भागात सहजिवन नगर आहे़ या ठिकाणी एका घराच्या मागे तात्पुरते शेड उभारण्यात आले असून त्यात स्पिरीट, पाणी व फ्लेवर एकत्र करुन बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी दारु तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्यासह सुनील विंचूरकर, महेेंद्र कापुरे, संदिप थोरात, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, आरीफ शेख, गौतम सपकाळ, विजय सोनवणे, रविकिरण राठोड, उमेश पाटील, चेतन कंखरे, मयूर पाटील, महिला पोलीस कविता देशमुख, चालक दीपक पाटील याशिवाय धुळे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, मिलींद सोनवणे, विजय जाधव, मुक्तार मन्सुरी यांनी छापा टाकला़
या कारवाईत बनावट दारुसह तयार करण्याचे साहित्य आणि एमएच ०२ एमए ८१०० क्रमांकाची कार असा एकूण १ लाख ७९ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी संशयित गणेश नारायण निकम (४०) रा़ प्लॉट नंबर १२, सहजिवन नगर, धुळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ हेड कॉन्स्टेबल सुनील विंचूरकर यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित गणेश निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़