साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाड्यातून पाणी सोडा हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 05:29 PM2023-05-31T17:29:20+5:302023-05-31T17:30:06+5:30
शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांची पाय पडून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
राजेंद्र शर्मा, लोकमत, धुळे: पांझरा नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून त्यासाठी पाणी सोडावे, असे मागणी करणारे पत्र शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी बुधवारी प्रा.पाटील यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.
यावेळी चर्चा करताना प्रा.पाटील यांनी, साहेब, तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, असे सांगितले. यावेळी प्रा.शरद पाटील यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत किंवा दोन दिवसात जर पाणी सोडले नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यंदा उन्हाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात विहिरींनी तळ गाठला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर महिन्याभरापासून याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
शेवटी बुधवारी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदखेडा तालुक्यात वाडी शेवाडी आणि अमरावती धरणातून पाणी सोडले जाते. म्हणजे ज्याठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्याठिकाणी लगेच पाणी सोडले जाते. मग धुळे तालुक्यात अक्कलपाड्याचे पाणी सोडण्यास काय अडचण होत आहे, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांना विचारला. म्हणजे ज्याठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत, अशा ठिकाणी जाणूनबुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप केला.
यावेळी प्रा.शरद पाटील यांनी अचानकपणे हात जोडून साहेब तुमच्या पाया पडतो, अक्कलपाडातून पाणी सोडा हो, असे सांगत पाय पडले. अचानकपणे हे घडल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांना थांबवून असे करू नका, अशी विनंती केली. बुधवारी सायंकाळपर्यंत अथवा दोन दिवसात पाणी सोडले नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिला.