धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:44 PM2024-11-26T15:44:56+5:302024-11-26T15:48:38+5:30

धुळ्यातील एका गावात काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना शून्य मते मिळाल्याचा दावा करण्यात येत होता.

False claim that Congress candidate Kunal Patil did not get a single vote in Avadhan village of Dhule goes viral | धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

Dhule Rural Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. १०१ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कुणाल पाटील यांचा भाजपच्या राघवेंद्र पाटील यांनी ६६ हजार ३२० मतांनी पराभव केला. मात्र कुणाल पाटील यांना एका गावातून शून्य मते मिळाल्याने समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून महायुतीचे राघवेंद्र पाटील विजयी झाले आहे. राम भदाणे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांचा ६७ हजार मतांनी पराभव केल्यानंतर धुळ्यातील अवधान गावाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये काँग्रेस समर्थक गोंधळ घालताना दिसत होते. अवधान गावातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना शून्य मते मिळाल्याचा दावा करण्यात येता होता. मात्र आता निवडणूक अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. अवधानमध्ये कुणाल पाटील यांना १०५७ मते मिळाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने सांगितले आहे.

विधासभेच्या निकालानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया अध्यक्ष पंखुडी पाठक यांनीही व्हिडिओ शेअर केला. "महाराष्ट्रातील अवधान गावातील ७० टक्के लोक विरोध करत आहेत. कारण त्यांनी मतदान करुनही येथे काँग्रेसला शून्य मते मिळाली आहेत. आता जनता रस्त्यावर उतरून हे जाहीरपणे सांगत आहे. भाजपने मते चोरली याचा आणखी किती पुरावा हवा?," असे या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धुळे जिल्हा निवडणूक कार्यालयाने याबाबत खुलासा करत हा दावा फेटाळून लावला आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण चार मतदान केंद्रे असल्याची माहिती धुळेचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे उमेदवार कुणालबाबा रोहिदास पाटील यांना मतदान केंद्र क्रमांक २४७ वर २२७, मतदान केंद्र क्रमांक २४८ वर २३४ मते, मतदान केंद्र क्रमांक २४९ वर २५२ आणि मतदान केंद्र क्रमांक २५० वर ३४४ मते मिळाली आहेत.

तसेच ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक रिटर्निंग ऑफिसर रोहन कुंवर यांनीही व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. अवधान येथील चार मतदान केंद्रांवर एकूण २ हजार ८८१ मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना एकूण १०५७ तर भाजपचे उमेदवार राघवेंद्र उर्फ ​​रामदादा पाटील यांना एकूण १७४१ मते मिळाली.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, २३ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निकालात भाजपचे राघवेंद्र रामदादा मनोहर पाटील यांना १,७०,३९८ मते मिळाली. तर काँग्रेसचे कुणालबाबा रोहिदास पाटील यांना १,०४,०७८ मते मिळाली आहेत.

Web Title: False claim that Congress candidate Kunal Patil did not get a single vote in Avadhan village of Dhule goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.