कर्ज मंजुरीचा खोटा बहाणा, महिलेला ८० हजारात गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:30 PM2020-12-29T22:30:28+5:302020-12-29T22:30:53+5:30
शिंदखेडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा
धुळे : कर्जाची फाईल तयार करुन कर्ज मंजूर करतो असे खोटे सांगून एका महिलेला ८० हजारात फसवणूक केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यात घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला.
कर्जाची फाईल तयार करुन कर्ज मंजूर करुन देतो अशी खोटी बतावणी शिंदखेडा तालुक्यातील अमळथे येथील रिना गुलाब सैंदाणे (३६, रा. अमळथे, ता. शिंदखेडा) या महिलेला विश्वासात घेण्यात आले. या महिलेला कर्ज हवे होते. त्यामुळे कर्ज उपलब्ध करुन देण्याबदल्यात ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. कर्ज मिळणार असल्यामुळे या महिलेने साधारण १ वर्षापुर्वी ८० हजाराची रक्कम दिली. त्यानंतर लवकरच कर्ज उपलब्ध करुन देऊ असे वेळोवेळी सांगण्यात आले. पण, कर्ज काही उपलब्ध होत नव्हते. याला १ वर्ष होवून गेल्याने आपली फसगत झाल्याचा अंदाज आल्याने रिना सैंदाणे या महिलेने शिंदखेडा पोलीस ठाण्यात जावून २९ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विजय देवरे (रा. धुळे), राजेंद्र निळकंठ पाटील (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) आणि मनिषा पाटील (रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) या तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. माळी करीत आहेत.