धुळयाचे आमदार अनिल गोटेंचा खोटेपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:02 PM2018-06-17T13:02:24+5:302018-06-17T13:02:24+5:30
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरेंची टिका
धुळे- शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटूंबियांना दिलेल्या आश्वासनानुसार त्यांना 98 लाख 88 हजार रूपयांची मदत मिळवून दिली असून त्यामुळे आमदार अनिल गोटे यांचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे, अशी टिका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र त्यांनी आमदारांचा थेट नामोल्लेख करणे टाळले.
आमदार अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रक काढून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यावर शहीद जवान योगेश भदाणे याच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप केला होता. हा आरोप खोडून काढत डाॅ. भामरे यांनी आमदारांवर नाव न घेता टिका केली. शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटूंबियांना देण्यात आलेल्या 98 लाख 88 हजार रूपयांच्या आर्थिक मदतीचा सविस्तर तपशिलही डाॅ. सुभाष भामरे यांनी जाहीर केला. त्याचप्रमाणे शहीद जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव खलाणे गावात हेलिकाॅप्टरने आणण्यात आले होते पण डाॅ. सुभाष भामरे यांच्या व्देषाने आंधळे झालेल्यांना ते दिसले नाही, आमदारांनी आपल्यावरच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आर्मी व जवानांवर टिका करून त्यांचा अवमान केला आहे अशी टिकाही डाॅ. भामरे यांनी आमदारांवर केली. विकृत लोकप्रतिनिधी हेच शहराचे दुर्देव आहे. खोटे व घाणेरडे आरोप करायचे, धमक्या द्यायच्या, लक्ष विचलित करायचे हेच संबंधित लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे डाॅ. भामरे म्हणाले.