ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला डांबून ठेवले
By admin | Published: February 27, 2017 01:00 AM2017-02-27T01:00:04+5:302017-02-27T01:00:04+5:30
साक्री तालुका : कर्नाटकातील मुकादमाविरुद्ध गुन्हा, पैसे परत न केल्याचे कारण
धुळे : ऊसतोडणी कामासाठी दिलेले पैसे परत केले नाही म्हणून साक्री तालुक्यातील पचाळे येथील कामगाराच्या कुटुंबाला कर्नाटकातील मुकादमाने डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी निजामपूर पोलिसात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत शांताराम भिवसन अहिरे (वय ३८, रा़ पचाळे, ता़ साक्री) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यात म्हटले आहे की, सुभानअल्ला रसूलसाहब वाळेकर (रा़ अर्जुनगी, ता़ इन्डी, जि़ बिजापूर, कर्नाटक) या मुकादमाने ऊसतोडणी मजुरी कामासाठी पैसे दिले होते़
चौघांना ठेवले डांबून
मात्र घेतलेले पैसे काम करूनदेखील फेड केले नाही, या कारणावरून पत्नी संगीताबाई अहिरे, मुलगा संतोष (वय १५), मुलगी सोनाली (वय १३) व मुलगा गुड्ड्या (वय १०) या चौघांना १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेपासून अर्जुनगी येथील त्याच्या शेतातील पत्र्याच्या घरात डांबून ठेवले. तसेच पैसे परतफेड केले नाही तर चौघांचे बरेवाईट करेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
मुकादमाविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी मुकादम सुभानअल्ला वाळेकर याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४४ प्रमाणे शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्ह्यात यापूर्वीही असे प्रकार प्रत्ययास आले असून प्रशासनाने पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.