फरार दिनेश गायकवाड एलसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 06:21 PM2017-10-01T18:21:01+5:302017-10-01T18:21:27+5:30
गोंदूररोडवर कारवाई : तालुका पोलिसांना सुपूर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चंद्रपूर पोलिसांना हिसका देत फरार असलेला दिनू डॉन उर्फ दिनेश निंबा गायकवाड (३४) याला रविवारी दुपारी धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देवपुरातील गोंदूर रोडवरुन शिताफीने ताब्यात घेतले़ त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला धुळे तालुका पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दारु पुरविण्याबाबत धुळे जिल्ह्यातील मद्यसम्राट दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याचे नाव समोर आले होते़ त्यामुळे या प्रकरणाबाबत चौकशी करण्यासाठी आणि संशयित दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्यासह पोलिसांचे पथक २० आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील शिरुड गावात पोहचले़ त्याठिकाणी दिनेश गायकवाडची चौकशी करत असताना त्याच्यासह प्रवीण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली़ त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला़ शासकीय कामात अडथळा आणत दिनू डॉन हा फरार होण्यात यशस्वी ठरला होता़
तो देवपूर परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांना मिळाली़ लागलीच त्यांनी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुरातील गोंदूर रोडसह विविध ठिकाणी सापळा रचला़ पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल हिरालाल ठाकरे, संदिप थोरात, गौतम सपकाळे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, आरीफ शेख, उमेश पवार, मनोज बागुल, मयूर पाटील, रवीकुमार राठोड, कविता देशमुख यांनी गोंदूर रोड भागात रविवारी दुपारी सापळा लावला आणि दिनू डॉनला अटक केली़ पुढील कारवाईसाठी त्याला धुळे तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़
संशयित दिनेश गायकवाड याच्याविरोधात धुळे जिल्ह्यात चोरी, खंडणी मागणे, मारामारी करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, दारुची तस्करी करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत़ याशिवाय जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत़