पुलाच्या स्वच्छतेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:18 PM2019-12-04T22:18:37+5:302019-12-04T22:18:53+5:30
ठेकेदाराचे दुर्लक्ष : बांधकाम पक्के होण्यासाठी पूलावर पाणी टाकण्यात आले नसल्याचा आरोप
कापडणे : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कापडणे हद्दितील धमाणे रोडावर तब्बल दीड वर्षानंतर संथ गतीने पूल उभारला गेला आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारीही सुरू झाली आहे. मात्र सदर केलेल्या पुलावर अनावश्यक वाळू व घाणीचा खच साचलेला आहे. यामुळे पडलेल्या वाळूवरून वाहने घसरून मोठा अपघात होण्याची भिती आहे. पुलाची साफसफाई करण्यात यावी यासाठी बुधवारी परिसरातील शेतकऱ्यांनी निषेधात्मक आंदोलन केले.
पुलाचे काम विलंबाने केले मात्र अनेक समस्यांच्या गर्तेत पूल अडकला. पुलाचे काम होवून बरेच दिवस झाले मात्र त्यावरील अनावश्यक घाण उचलण्यास सदर ठेकेदाराकडून असमर्थता दिसून येत आहे. बांधकाम केलेल्या पुलावरती नियमित पाणी मारले गेले नाही अशी तक्रार येथील शेतकºयांची आहे. पुलावर बांधकाम करून उरलेली वाळू व पाणी टाकण्यासाठी बनविण्यात आलेले चौकोनी बंधारे काढले नसून मोठ्या प्रमाणात रेती व अनावश्यक कॉंक्रीटचे पक्के मटेरियल, पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाºया उरलेल्या खडीचे ढिगारे तसेच पडून आहेत.
पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाला आवश्यक तो दाब दिला गेला नसल्याने पुलाचा व रोडाचा उतार व्यवस्थित काढला गेलेला नाही. दोन्ही बाजूला मातीचा भराव अतिशय अरुंद असून समांतर केलेला नाही.
पुलाच्या दोन्ही बाजूस डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण केलेले नसून संरक्षण कठडे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर पुलावरून वाहने चालवत असताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना रात्री-अपरात्री अंधारात पुलाचा व रोडाचा अंदाज न आल्यास वाहने पुलावरून नाल्यात पडण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजुचे रस्ते अजूनही नादुरुस्त व अत्यंत खराब झालेले आहेत.
सदर बांधकाम केलेल्या पुलावरील सर्व समस्या सोडविण्यात याव्यात व पुलावरील घाण तात्काळ उचलावी यासाठी कापडणे येथील शेतकºयांनी पुलाचे काम करणारा सदर विभाग व संबंधित ठेकेदार विरुद्ध निषेधात्मक आंदोलन केले. या आंदोलनात कापडणे येथील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय वाघ, राजेंद्र शालिग्राम पाटील, मोहन खलाणे, आनंदा माळी, दत्तात्रय नथू वाघ, बबलू देसले आदी शेतकºयांनी आंदोलन केले आहे.