नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ; दीड महिन्यात केवळ पाच शेतकऱ्यांनी केली ॲानलाइन नोंदणी
By अतुल जोशी | Published: November 17, 2023 05:40 PM2023-11-17T17:40:31+5:302023-11-17T17:40:41+5:30
नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी व रागी खरेदीसाठी १ ॲाक्टोबर २०२३पासून ॲानलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
धुळे : नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी व रागी खरेदीसाठी १ ॲाक्टोबर २०२३पासून ॲानलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी धुळे जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ॲानलाइन नोंदणीला प्रतिसादच मिळालेला नाही. गेल्या दीड महिन्यात अवघ्या पाच शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. ज्वारी, बाजरी, रागी खरेदीसाठी नोंदणीच झालेली नाही. ॲानलाइन नोंदणीसाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे उरलेल्या १३ दिवसात किती नोंदणी होईल, हा एक प्रश्नच आहे.
धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना १० ॲाक्टोबर ते ३० नोव्हेंबर २३ या कालावधीत ॲानलाइन नोंदणी करता येणार आहे. हमी भावाने खरेदीसाठी नाफेडतर्फे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर व दोंडाईचा या चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नाफेडतर्फे १ डिसेंबर २३ ते ३१ जानेवारी २४ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी ॲानलाइन नोंदणी केली आहे, त्यांच्या धान्याची खरेदी केली जाणार आहे. शासनातर्फे मक्याला २,०९०, ज्वारीला ३,१८० बाजरी २,५००, तर रागीला ३,८४६ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.
केवळ पाच शेतकऱ्यांकडून नोंदणी
जिल्ह्यात ॲानलाइन धान्य नोंदणीला प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या दीड महिन्यात केवळ मका खरेदीसाठी पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात धुळे केंद्रावर एक व दोंडाईचा केंद्रावरील चार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.