स्पर्धा परीक्षेला वडिलांचा नकार, विद्यार्थ्याची शाळेतच आत्महत्या; भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई लिहिले
By देवेंद्र पाठक | Published: February 12, 2024 06:29 PM2024-02-12T18:29:06+5:302024-02-12T18:29:10+5:30
धुळे तालुक्यातील मोराणे येथील एका शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे: धुळे तालुक्यातील मोराणे येथील एका शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. घरच्या परिस्थितीअभावी पालकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिल्याने त्याला नैराश्य आले आणि त्यांनी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथे राहणारा केतन विनायक मोरे (वय १७) हा धुळे तालुक्यातील अकलाड मोराणे येथील एका निवासी शाळेत शिकत होता. त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे सुटीत तो घरी आला असता त्याने वडिलांना ही बाब बोलून दाखविली होती. परंतु, वडील विनायक मोरे हे शेती करत असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खर्च आपल्याला झेपणार नाही, असे सांगत त्याला नकार दिला. मात्र, केतन याने ही बाब मनाला लावून घेतली. त्याने शाळेत गेल्यानंतर वसतिगृहातील भिंतीवर एमपीएससी, युपीएससी असे लिहिलेले होते. परंतु, वडिलांनी नकार दिल्याने अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही, असे त्याला वाटले असावे, यातून रविवारी सकाळी शाळेतील वसतिगृहाच्या बाथरुममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई असे लिहिलेले होते. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच वसतिगृहात खळबळ उडाली. घटनेची माहिती केतन याच्या पालकांना कळविण्यात आली. तातडीने पालक घटनास्थळी दाखल झाले. केतन याला रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून केतन याला मयत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू आहे.