धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी ३६ मंडळांतर्फे बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:53 AM2019-09-07T11:53:52+5:302019-09-07T11:54:54+5:30
विसर्जन मिरवणुकीत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला, गुलालाची मुक्त उधळण
आॅनलाइन लोकमत
धुळे : सोमवारी जल्लोषात आगमन झालेल्या गणरायाचे आता टप्या-टप्याने विसर्जन होऊ लागले आहे. पाचव्या दिवशी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार ’ अशा गगनभेदी घोषणा देत आपल्या लाडक्या दैवताला भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते.
सोमवारी विघ्नहर्ता गणरायाचे वाजत गाजत, जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. जिल्ह्यात २८८ लहान व १६४ मोठे सार्वजनिक, ५९ गावात एकगाव एक गणपती अशी एकूण ५१३ मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.
जिल्ह्यात तीन, पाच, सात, नऊ व अकरा अशा पाच टप्यात गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.
विसर्जनाच्या दुसऱ्या टप्यात अर्थात पाचव्या दिवशी जिल्ह्यात ३० सार्वजनिक व सहा एक गाव एक गणपती अशा एकूण ३६ मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यात देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन, निजामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १६ सार्वजनिक व सहा एक गाव एक गणपती, शिरपूर शहर-१, शिंदखेडा-३, दोंडाईचा-३ नरडाणा-१, शिरपूर तालुका-२, व थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्रींच्या मूर्तीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.
धुळे शहरात अजमेरा महाविद्यालयात स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. या महाविद्यालातर्फे हत्ती डोहात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
जैताणे
येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी पाच दिवस उत्साहात गणेश आराधना केली. शुक्रवारी पाचव्या दिवशी श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी ढोल ताशे, डीजेच्या गजरात सुरूवात झाली. यावर्षी मिरवणुकीत विशाल आकाराच्या गणेशमूर्ती तसेच सजवलेली वाहने याचे प्रमुख आकर्षण होते. मिरवणुकीत सर्वच २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य विशेष पेहरावात सहभागी झाले होते. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. गणरायाचा जयघोष करीत कार्यकर्ते नृत्य करण्यात तल्लीन झाले होते. मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत पार पडली.