कपाशी लागवडीचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:34 AM2019-06-13T11:34:54+5:302019-06-13T11:35:21+5:30
शेतकºयांना आता पावसाची प्रतिक्षा : लांबणीवर पडल्यास कांदा, मिरची पिकाचे क्षेत्र घटणार
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात हंगामपूर्व, लागवड योग्य क्षेत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात तर तुटपुंज्या पाण्याच्या आधारावर कापूस लागवड केलेल्या शेतकºयांना मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा लागून आहे. यावर्षी या परिसरात कांदा, मिरची या पिकांचे क्षेत्र घटणार आहे.
मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, कलवाडे, देवी, कर्ले, परसोळे आदी परिसरात या वर्षाच्या खरीप हंगामातील हंगामपूर्व मशागत अंतिम टप्प्यात असून बºयाच शेतशिवारात लागवड योग्य क्षेत्र तयार झाल्याचे दिसून येत आहे.
या भागात यावर्षी कापसाचे लागवड क्षेत्र वाढणार तर कांदा, मिरची आदी खूपच प्रमाणात कमी होणार आहे. कांदा, मिरची आदी पिकांची लागवड करायची झाल्यास महिनाभर अगोदर या वाणांचे रोप टाकावे लागते. महिना सव्वा महिन्यानंतर तयार झाल्यावर त्याची लागवड होत असते, असे जाणकार शेतकरी सांगतात. मात्र विहिरी, कुपनलिका कोरड्या ठाक असल्यामुळे रोप टाकण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय याला पाणी देखील भरपूर लागते व सुरवातीच्या काळात दररोज द्यावे लागते.
कापूस लागवड होवून ११-१२ दिवस झाले, विहिरीतील संग्रहीत पाणी देखील संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र मृग नक्षत्रात पाऊस येईल असे येथील शेतकºयांना आशा लागून होती म्हणून कापूस लागवड झाली. मात्र मृग नक्षत्र लागून आठवडा होत आहे. तरी पावसाचे चिन्ह नसल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.