अखेर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:02 PM2019-04-12T22:02:03+5:302019-04-12T22:02:46+5:30
पाटण ग्रामपंचायत : वैयक्तिक घरकुल योजनेत अनियमिततेची तक्रार
शिंदखेडा : अखेर पाटण ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी पाटण गावातील घरकुलात दुबार लाभ देऊन अनियमितता केली असल्याची फिर्याद शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी शिंदखेडा पोलिसात दिली आहे. त्यावरुन शिंदखेडा पोलिसात तत्कालीन सरपंच विशाल पवार व तत्कालीन ग्रामसेवक रामकृष्ण राजपूत यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.
पाटण येथील घरकुल व वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, त्याची कोणीच दखल न घेतल्याने उपसरपंचासह गावातील ७ नागरिकांनी १६ ते २७ मार्च दरम्यान बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, प्रशासनाने ९ एप्रिलपर्यंत वेळ मागितल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले होते. प्रशासनाने मागितलेली मुदत संपल्यानंतरही कोणतीच कारवाई न केल्याने उपसरपंचासह ४ जणांनी १० एप्रिलपासून पुन्हा उपोषणास प्रारंभ केला होता. त्यामुळे अखेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी शिंदखेडा पोलिसात पाटण येथील तत्कालीन सरपंच विशाल सुभाष पवार व तत्कालीन ग्रामसेवक रामकृष्ण मोहनसिंग राजपूत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, सन २००४-०५ मध्ये गावातील नावजी श्रीपत भिल यांना १२ हजार रुपये घर दुरुस्तीचा लाभ दिला असतांना त्यांना परत सन २०१६-१७ मध्ये १ लाख २० हजार रुपये घरकुलाचा दुबार लाभ तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात देऊन अनियमितता केली आहे व शासनाची फसवणूक केलेली आहे.
याबाबत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून त्यात अहवालात मुद्दा क्र २ मधील अ.क्र. १, ३, ४, ५, ६ यांच्या नावासमोर सर्वेमध्ये हो, असे दाखवले असतांना त्यांच्या मुलांनाही शौचालयाचा लाभ त्यांचे नमुना नंबर ८ला नाव नसतांना देण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यार गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी तिसºया दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.